मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारास अटक

चोरीचे 1 लाख 16 हजाराचे वीस मोबाईल हस्तगत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 ऑक्टोंबर 2025
मिरारोड, – मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील एका सराईत गुन्हेगाराला काशिगाव पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अब्दुल रेहमान ताहीर बडू असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे 1 लाख 16 हजार रुपयांचे वीसहून अधिक मोबाईल जप्त केले आहे. अब्दुल हा रेकॉर्डवरील ुगुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मोबाईल चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आल होते.

हाफीजुल रेहमान आरिफ शेख हा 20 वर्षांचा तरुण मिरारोडच्या काशिगाव, डाचकुल पाड्याजवळील तोयबा नगर परिसरात राहत असून तिथेच त्याच्या मालकीचे एक किराणा मालाचे दुकान आहे. 9 ऑक्टोंबरला त्याच्या घरात प्रवेश करुन अज्ञात व्यक्तीने त्याचा तीस हजार रुपयांचा मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर लक्षात येताच त्याने काशिगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली होती. गेल्या काही दिवसांत अशाच प्रकारच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी काशिगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली होती.

पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पुजारी, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे, विजय साठे, पोलीस हवालदार प्रताप पांचुदे, पोलीस शिपाई विक्रांत खंदारे, उमंग चौधरी, किरण विरकर, टोबर, रविंद्र सोनावणे, नामदेव देवकांते, अभिषेक मडावी यांनी तपास सुरु करुन आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान मिरारोड येथून संशयास्पद फिरणार्‍या अब्दुल रेहमान बडू याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

चौकशीत तो मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याने हाफीजुल शेख यांच्या मोबाईलसह इतर काही मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या नालासोपारा येथील जामा मशिदजवळील राहत्या घरातून पोलिसांनी चोरीचे वीसहून अधिक मोबाईल जप्त केले. त्याची किंमत एक लाख सोळा हजार रुपये इतकी किंमत आहे. या गुन्ह्यांचा पोलीस हवालदार प्रताप पांचुदे हे तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page