मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 मे 2025
मुंबई, – सार्वजनिक शौचालयात मोबाईलद्वारे व्हिडीओ रेकॉडिंग करुन अल्पवयीन मुलीसह महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी राजनकुमार प्रमोद चोपाल या 19 वर्षांचा तरुणाला एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगास पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला विशेष कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राजनकुमार हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून त्यात काही अल्पवयीन मुलीसह महिलांचे व्हिडीओ असल्याचे उघडकीस आले आहे.
बुधवारी सायंकाळी सहा वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांच्या आदेशावरुन एल. टी मार्ग पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. भुलेश्वर येथील आत्माराम मर्चंट मार्ग येथून गस्त घालताना दोन महिलांनी पोलिसांना माहिती दिली की, भुलेश्वर येथील कॉमन टॉयलेट वापरत असताना अज्ञात व्यक्तीने तिथे मोबाईलद्वारे व्हिडीओ रेकॉडिंग सुरु ठेवल्याचे सांगितले. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलीस पथक तिथे गेले आणि त्यांनी टॉयलेटमधून मोबाईल जप्त केला होता.
तपासात तो मोबाईल राजनकुमार चोपाल याचा असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच त्याचा मोबाईल कॉमन टॉयलटमध्ये ऑन करुन त्याद्वारे काही अल्पवयीन मुलीसह महिलांचे व्हिडीओ रेकॉडिंग केल्याची कबुली दिली. याप्रकरणी संबंधित महिलांनी तक्रार देण्यास नकार दिला, मात्र पोलिसांनी स्वतहून राजनकुमारविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
राजनकुमार बिहारचा रहिवाशी असून दोन महिन्यांपूर्वीच कामासाठी मुंबईत आला होता. सध्या तो नमो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. त्याला या कॉमन टॉयलेटची माहिती होती, या टॉयलेटचा अल्पवयीन मुलीसह महिलांकडून वापर होत असल्याने त्याने त्याच्या मोबाईलवरुन व्हिडीओ रेकॉर्डिंग केले होते. त्याच्या मोबाईलमध्ये काही व्हिडीओ पोलिसांना सापडले आहेत. अटकेनंतर त्याला विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.