56 लाखांचे चोरीसह गहाळ 347 मोबाईल मूळ मालकांना परत
मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी मानले पोलिसांचे आभार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 ऑगस्ट 2025
मुंबई, – सुमारे 56 लाख रुपयांचे चोरीसह गहाळ झालेले 347 मोबाईल त्याच्या मूळ मालकांना एका विशेष कार्यक्रमांत परत करण्यात आले. चोरीसह गहाळ झालेले मोबाईल परत मिळतील अशी कोणतीही आशा नसताना परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या आदेशावरुन स्थानिक पोलिसांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांचे मोबाईल परत मिळाले आहे. त्यामुळे या तक्रारदारांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. दुसरीकडे देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने व उपायुक्त रागसुधा आर यांनी परिमंडळ चारच्या सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचे कौतुक केले.
गेल्या काही वर्षांत मोबाईल चोरीसह गहाळ होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. मोबाईल चोरीसह गहाळ झाल्यानंतर तक्रारदारांनी विविध पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत चोरीसह गहाळ झालेले मोबाईल शोधून काढण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ चारच्या अधिकार्यांनी 20 जुलै ते 5 ऑगस्ट 2025 या पंधरा दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेतंर्गत पोलिसांनी 2022 ते 2025 या कालावधीत चोरीसह गहाळ झालेले मोबाईल शोधून काढून ते मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी सायन येथील नार्थ इंडियन असोशिएशनमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या हस्ते 2022 साली 48, 2023 साली 34, 2024 साली 96 आणि 2025 साली चोरीसह गहाळ झालेलेे 169 असे 56 लाख 30 हजार 895 रुपयांचे 347 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. चोरीसह गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या मूळ मालकांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी त्यांनी परिमंडळ चारच्या सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचार्याचे आभार व्यक्त केले आहे.