महिला पोलीस शिपायाचा मोबाईल चोरी करुन पलायन

पळून गेलेल्या त्रिकुटास चोरीच्या मोबाईलसह अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मार्च २०२४
मुंबई, – पोलीस ठाण्यात ड्यूटीवर जाणार्‍या एका महिला पोलीस शिपायाचा मोबाईल चोरी करुन पळून गेलेल्या एका त्रिकुटाला माहीम पोलिसांनी अटक केली. अनस शहाजहा शेख, फुजल सईद अहमद खान आणि मोहम्मद कासिब मोहम्मद खालिद सिद्धीकी अशी या तिघांची नावे असून ते तिघेही भायखळ्यातील रहिवाशी आहेत. या तिघांकडून पोलिसांनी चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शीतल सुरेश घुगरे या डोंबिवलीतील भार्गवी छाया अपार्टमेंटमध्ये राहत असून माहीम पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ९ मार्चला तिची रात्रपाळी होती. त्यामुळे ती साडेआठ वाजता माहीम येथून सेनापती बापट मार्गावरुन पोलीस ठाण्याच्या दिशेने पायी जात होती. यावेळी बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी तिच्याकडील मोबाईल घेऊन पलायन केले होते. पळून जाणार्‍या दोन्ही आरोपींचा तिने पाठलाग केला, मात्र ते दोघेही सुसाट वेगाने पळून गेले होते. पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिने घडलेला प्रकार ठाणे अंमलदारांना सांगून तिथे दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींची माहिती काढण्याचा प्रयत्न सुरु केला होता. तांत्रिक माहितीसह मिळालेल्या माहितीवरुन सहाय्यक पोलीस आयुक्त संजय कुरंदरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर शिरसाट, पोलीस निरीक्षक अनिल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र सानप, बाळासाहेब पोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोकरे, पोलीस शिपाई ससाणे, कांबळे, वाघ, घरत, बच्छाव, पाटील, पालवे, पाटील आणि पोलीस हवालदार पवार यांनी भायखळा येथून अनस शेख, फुजल खान आणि मोहम्मद कासिब सिद्धीकी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page