मोक्काच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस तीन वर्षांनी अटक

दोन्ही आरोपीविरुद्ध सोनसाखळी चोरीसह इतर गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 मे 2025
मुंबई, – मोक्का गुन्ह्यांतील वॉण्टेड असलेल्या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तीन वर्षांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अब्दुल रेहमान अफजल खान ऊर्फ शेरा आणि नफीस अहमद रोज खान अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोन्ही आरोपीविरुद्ध सोनसाखळी चोरीसह इतर गुन्ह्यांची नोंद असून ते दोघेही पोलीस अभिलेखावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदार महिला गोरेगाव येथे राहत असून तिचे पती भारतीय रेल्वेतून निवृत्त झाले आहेत. 16 फेब्रुवारी 2022 रोजी ती तिच्या पतीसोबत घरगुती सामान आणण्यासाठी बाहेर आली होती. यावेळी तिचे पती औषध आणण्यासाठी मेडीकल स्टोरमध्ये गेले होते. ती तिच्या पतीची वाट पाहत होती. याच दरम्यान तिथे एक तरुण आले आणि त्याने तिच्या गळ्यातील दोन लहान-मोठे सोन्याचे मंगळसूत्र खेचून त्याच्या दुसर्‍या सहकार्‍याच्या बाईकवरुन पळून गेला होता. तिने आरडाओरड केल्यानंतर गस्तीवर असलेलया पोलिसांनी अब्दुल खान आणि नंतर नफीस खान या दोघांना अटक केली होती.

चौकशीदरम्यान ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्याविरुद्ध सोनसाखळी चोरीसह इतर गुन्ह्यांची नोंद होती. विविध पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होते. याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असताना दोन्ही आरोपींना जामिन मंजूर झाला होता. याच दरम्यान या दोघांविरुद्ध पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र मोक्का लागताच ते दोघेही फरार झाले होते. ते दोघेही खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होते. त्यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. या दोघांचा गोरेगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरु होता.

ही शोधमोहीम सुरु असताना अब्दुल रेहमान खान आणि नफिस खान या दोघांना शुक्रवारी गुन्हे शाखेच्या युनिट अकराच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यांच्या चौकशीतून ते दोघेही मोक्का गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांना पुढील चौकशीसाठी गोरेगाव पोलिसांकडे सोपविण्यात आले. या दोघांचा ताबा मिळताच त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page