मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मे 2025
मुंबई, – मुंबई शहरात आयोजित करण्यात आलेला मॉक ड्रिलचा सराव शांततेत पार पडला. युद्ध झाल्यास अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या नागरी संरक्षण विभागाच्या मुख्यालयात बुधवारी हा मॉक ड्रिल करण्यात आला होता. यावेळी पोलिसांसह अग्निमशन दल, एनडीआरएफ तसेच एक हजार स्वयंसेवी सहभागी झाले होते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थित दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास, युद्धाचा सामना करण्यासाठी कशा प्रकारे सामारे जावे यासाठी बुधवारी मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी मॉल ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. क्रॉस मैदानात नागरी संरक्षण विभागाचे एक मुख्यालय आहे. याच मुख्यालयात बुधवारी सायंकाळी चार वाजता हा मॉक ड्रिल घेण्यात आला होता. अचानक युद्धजन्य परिस्थितीत निर्माण झाली, इमारतीवरन हल्ला आणि बॉम्बस्फोटामुळे आग लागल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. त्यात एनसीसी आणि एनएनएसच्या विद्यार्थ्यासह इतर यंत्रणेने भाग घेतला होता. त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी या मॉक ड्रिलमध्ये आपला सहभाग दिला होता.
इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना सुखरुप बाहेर काढण्याचे दाखविण्यात आले होते. इमारतीमध्ये जखमी झालेल्या लोकांना छतावरुन सुरक्षित खाली उतरविण्यात आले आणि नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा सराव करण्यात आला होता. सायरन वाजवून हल्ल्याची माहिती देण्यात आली. यावेळी नियंत्रण कक्षातून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यता आले होते. त्यात स्थानिक पोलिसांसह एनडीआरएफ, महानगरपालिका, वाहतूक विभागाचा समावेश होता. या मॉक ड्रिलमध्ये प्रत्येकाला ठराविक जबाबदारी सोपविण्यात आली होती, ही जबाबदारी सर्वांनी व्यवस्थीत पार पाडल्याचे नागरी संरक्षण विभागाचे संचालक प्रभातकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.