लोअर येथे मॉडेलच्या घरी पंधरा लाखांची घरफोडी
सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जानेवारी २०२५
मुंबई, – कर्नाटक येथे गावी गेलेल्या एका मॉडेलच्या फ्लॅटमध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फ्लॅटमध्ये प्रवेश करुन सुमारे पंधरा लाखांची घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्याने सुमारे दहा लाखांची कॅशसहीत सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले आहे. याप्रकरणी ना. म जोशी मार्ग पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे. अपार्टमेंटसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. इंडिया बुल स्कॉय फॉरेस्टसारख्या पॉश अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक असताना फ्लॅटमध्ये झालेल्या घरफोडीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
निकिता निल बराड ही महिला मूळची कर्नाटकची रहिवाशी आहे. सध्या ती लोअर परेल येथील सेनापती बापट मार्ग, इंडिया बुल स्काय फॉरेस्ट अपार्टमेंटच्या ए/२/२९०४ मध्ये एकटीच राहते. तिच्याकडे घरकामासाठी दोन महिला असून त्या दिवसभर काम करुन त्यांच्या घरी जातात. निकिता ही सध्या मॉडेलिंग क्षेत्रात काम शोधत आहे. तिला तिचे भाऊ आर्थिक मदत करतात. १२ डिसेंबरला ती तिचा लहान भाऊ अंकित याच्यासोबत त्यांच्या कर्नाटक येथील हुबळी गावी गेली होती. ९ जानेवारीला रात्री नऊ वाजता ती गावाहून मुंबईत परत आली होती. दुसर्या दिवशी तिने कपाटातील दागिन्यांची पाहणी केली असता तिला कपाटात दागिने दिसले नाही. तसेच तिने ड्राव्हरमध्ये दहा लाखांची कॅश ठेवली होती. ती कॅशही चोरीस गेल्याचे तिला दिसून आले. त्यामुळे तिने संपूर्ण कपाटाची पाहणी केली असता तिला कुठेच सोन्याचे दागिने आणि कॅश सापडले नाही.
कर्नाटक येथे गावी असताना फ्लॅटमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने फ्लॅटमध्ये प्रवेश करुन दहा लाखांची कॅशसहीत सोन्याचे दागिने असा १५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने ना. म जोशी मार्ग पोलिसांना घडललेा प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या घरफोडीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना तपासाचे आदेश दिले आहेत. या आदेशांनतर पोलिसांनी अपार्टमेंटसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पळून गेलेल्या चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.