तरुणीचा विनयभंग करुन सोशल मिडीयावर बदनामीचा प्रयत्न

दिड वर्षांनी आरोपीस अटक; पोलिसांना दिले होते आव्हान

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 जुलै 2025
मुंबई, – नोकरीच्या आमिषाने एका 27 वर्षीय तरुणीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करुन तिचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन बदनामी केल्याप्रकरणी एका आरोपीस आरे पोलिसांनी अटक केली. नुरुल्लाह मदनी मोहम्मद निजामुद्दीन असे या 37 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवाशी आहे. गेल्या दिड वर्षात तो बिहार आणि नेपाळमध्ये वास्तव्यास असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी सांगितले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडीत आहे. गुन्हा दाखल होताच नुरुल्लाहने चौकशीसाठी हजर राहण्यास नकार देत पोलिसांना हिम्मत असेल तर अटक करुन दाखवा असे खुले आव्हान दिले होते, ते आव्हान स्विकारुन त्याला दिड वर्षांनी अटक करण्यात आरे पोलिसांना यश आले आहे.

पिडीत मुलगी ही 27 वर्षांची असून ती उत्तर मुंबईत राहते. गेल्या वर्षी ती नोकरीच्या शोधात होता. त्यासाठी ती नियमित फिल्मसिटीमध्ये नोकरीसाठी येत होती. तिथे काम मिळावे यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान तिची नुरुल्लाहशी ओळख झाली होती. फिल्मसिटीमध्ये नुरुल्लाह हा लहानसहान काम करत होता. त्याने तिला तिथे नोकरी देण्याचे आश्वासन देत तिच्याशी जवळीक निर्माण केली होती. गेल्या वर्षी त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. नोकरीच्या आमिषाने तिचे शोषण करुन त्याने तिचे काही अश्लील फोटो काढले होते. ते फोटो दाखवून तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता. या कारणावरुन या दोघांमध्ये प्रचंड वाद झाला होता. तिने त्याला पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती.

या धमकीनंतर रागाच्या भरात त्याने तिचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने नुरुल्लाहविरुद्ध आरे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी 354, 354 (सी) भादवी सहकलम 67 आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच नुरुल्लाह हा पळून गेला होता. त्याला पोलिसांनी कॉल करुन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. यावेळी त्याने पोलिसांनाच हिम्मत असेल तर मला अटक दाखवाच अशी धमकी दिली होती. त्यानंतर तो मुंबईतून पळून गेला होता. गेल्या एक-दिड वर्षांपासून नुरुल्लाह या गुन्ह्यांत फरार होता. त्याची अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांना नुरुल्लाहच्या अटकेचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे, खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पांचाळ, पोलीस हवालदार नागरे, पोलीस नाईक महाले, पोलीस शिपाई पाटील, बरकडे यांनी त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना नुरुल्लाह हा मूळचा बिहारचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. गुन्हा दाखल होताच तो बिहारला पळून गेला होता. त्यामुळे संबंधित पोलीस पथक दोन ते तीन वेळेस बिहारला गेले होते, मात्र बिहारला गेलेल्या पोलीस पथकाला तो नेपाळला पळून गेल्याचे तसेच अधूनमधून बिहारला येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी या पथकाने नेपाळ सीमेवर काही दिवस साध्या वेशात पाळत ठेवली होती, बिहारला येण्यासाठी निघालेला नुरुल्लाहला ही माहिती मिळताच तो तेथूनही पळून गेला होता.

अलीकडेच तो बिहारहून फिल्मसिटी परिसरात आला होता. नुरुल्लाह हा पुन्हा फिल्मसिटीमध्ये कामाला रुजू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांना मिळाली होती. या माहितीनंतर उपनिरीक्षक सचिन पांचाळ व अन्य पोलीस पथकाने गेल्या दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या नुरुल्लाहला आरे जंगलातून शिताफीने अटक केली. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page