मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 सप्टेंबर 2025
मुंबई, – सामान आणण्यासाठी गेलेल्या एका दहावीच्या एका अल्पवयीन मुलीचा भरस्त्यात विनयभंग करुन एका आरोपीने पलायन केले होते, याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीला सलग दहा दिवस पाळत ठेवून सांताक्रुज पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे. पप्पू जागील नायक असे या 20 वर्षांच्या आरोपीचे नाव असून तो मूळचा ओरिसाचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
52 वर्षांचे तक्रारदार विलेपार्ले येथे राहत असून त्यांना पंधरा वर्षांची एक मुलगी आहे. ती सध्या दहावीत शिकते. 16 सप्टेंबरला रात्री नऊ वाजता ती घरातील सामान आणण्यासाठी दुकानात गेली होती. रस्तयावरुन जात असताना अचानक एका तरुणाने तिला मागून जोरात मिठी मारली. तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग करुन पळून गेला होता. भरस्त्यात घडलेल्या या घटनेने ही मुलगी प्रचंड घाबरली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
या गुन्ह्यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती पंडित यांनी गंभीर दखल घेत सांताक्रुज पोलिसांना आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सावंत, संजय कल्हाटकर, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत इंगवले, पोलीस हवालदार नितीन केणी, अभिषेक कर्ले, श्रीनिवास चिला, पोलीस शिपाई मारुती गावडे, नरेंद्र हिरेमठ, मनोज पाटील, प्रसाद यादव, तेजेस माने, आनंदा दिवाणजी यांनी जुहू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिषेक पाटील व अन्य पोलीस पथकाच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन आरोपी जुहू येथे पळून गेल्याचे उघडकीस आले होते. तो जुहूच्या नेहरुनगर परिसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने सलग दहा दिवस तिथे साध्या वेषात पाळत ठेवून पप्पू नायक या तरुणाला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच या मुलीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले. त्यानतर त्याला या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक अटक केली.
तपासात पप्पू हा मूळचा ओरिसाच्या गंजम, बरमपूरचा रहिवाशी असून सध्या विलेपार्ले येथील मिठीभाई कॉलेजच्या मागील झोपडपट्टीत राहतो. तो तिथेच बिगारी कामगार म्हणून कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.