अल्पवयीन कॉलेज मुलीचा विनयभंग करुन रिक्षातून ढकळून दिले
विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल होताच रिक्षाचालकास अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 डिसेंबर 2025
मुंबई, – अल्पवयीन कॉलेज मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करुन तिला चालत्या रिक्षातून ढकळून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह हत्येचा प्रयत्न व पोक्सोचा गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत पळून गेलेल्या रिक्षाचालकास मालाड पोलिसांनी अटक केली आहे. केशव प्रसाद यादव असे या आरोपी रिक्षाचालकाचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील बळीत मुलगी अल्पवयीन असून ती मालाड परिसरात राहते. उत्तर मुंबईतील एका नामांकित कॉलेजमध्ये ती शिक्षण घेते. सोमवारी ती कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाली होती. सायंकाळी चार वाजता ती मालाड येथील एस. व्ही रोडवर रिक्षाची वाट पाहत होती. काही वेळानंतर तिथे केशव यादव हा त्याची रिक्षा घेऊन आला होता. त्याला मालाडच्या आर्लेम, सुराणा हॉस्पिटलच्या दिशेने जायचे आहे असे सांगून ती रिक्षात बसली होती. रिक्षाच्या डाव्या बाजूला असलेल्या या मुलीला त्याने रस्त्याचे काम सुरु असल्याने तिला त्रास होऊ नये म्हणून मधोमध बसण्यास सांगितले. काही वेळाने त्याने रिक्षा तिने सांगितलेल्या मार्गावरुन न देता चुकीच्या मार्गाने नेण्याचा प्रयतन केला. रिक्षाच्या आरशातून तिच्याकडे पाहून तिला तीन वेळा डोळा मारला.
तिच्याशी अश्लील हावभाव करुन त्याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने त्याला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र त्याने रिक्षाचा वेग आणखीन वाढवला होता. त्यामुळे तिला आणखीन भीती वाटू लागली. त्यामुळे तिने जोरजोरात आरडाओरड करुन लोकांकडे मदतीची मागणी केली. यावेळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ असतानाही त्याने तिला चालत्या रिक्षातून जोरात धक्का देऊन रस्त्यावर ढकळून तेथून पलायन केले होते.
या प्रकारानंतर तिने मोबाईलवरुन तिच्या आईसह बहिणीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्या तिघीही मालाड पोलीस ठाण्यात गेल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांना तिने घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची त्यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंगासह हत्येचा प्रयत्न, पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मालाडच्या एस. व्ही रोड व लिंक रोडचे 25 ते 30 हून अधिक सीसीटिव्ही ताब्यात घेऊन रिक्षाचा क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केला.
रिक्षा क्रमांक प्राप्त होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश बागल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय बेडवाल, राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रायवाडे, पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे, रफिक गवंडी, पोलीस अंमलदार सातवसे, गावंड, फर्नाडिस, गोंजारी, जाधव, डोईफोडे, शेरे, वाघ, बाबर, थोरात यांनी कांदिवली परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून केशव यादव याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. केशव हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सध्या कांदिवलीतील लालजीपाडा परिसरात राहतो. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला दिडोंशीतील पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.