ऑस्ट्रेलियन नौसेनेच्या 23 वर्षांच्या तरुणीच्या विनयभंग

गुन्हा दाखल होताच खाजगी बसच्या चालकास अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मार्च 2025
मुंबई, – शेकहॅण्ड करण्याचा बहाणा करुन एका 23 वर्षांच्या ऑस्ट्रेलियन नौसेनेच्या अधिकारी तरुणीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच अनिल शरणाप्पा कांबळे या 32 वर्षांच्या खाजगी बसच्या चालकाला येलोगेट पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.

ही घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजता बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या ग्रीन गेटजवळील एका खाजगी बसमध्ये घडली. 23 वर्षांची तक्रारदार तरुणी ही ऑस्ट्रेलिया नौसेनेत एबी या पदावर काम करते. 5 मार्चपासून ती न्यूझीलंड देशाच्या जहाजावर कार्यरत आहे. 20 मार्चला ते जहाज बीपीटी इंदिरा डॉक, एक क्रमांक आयडीजवळ आले होते. त्याच दिवशी या जहाजाला न्यूझीलंडचे पंतप्रधानांनी भेट दिली होती. त्यानिमित्ताने जहाजावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी 22 मार्चला नेव्हल डॉक, एफएसटीसी येथे फुड फेस्टिव्हलचा कार्यक्रम होता. त्यात तक्रारदार तरुणीला आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे सायंकाळी सात वाजता ती खाजगी बसने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचली होती. यावेळी तिने बिअरचे सेवन केले होते.

कार्यक्रमावरुन रात्री साडेनऊ वाजता ती कुलाबा येथील गेटवे ऑफ इंडियाजवळील एका रेस्ट्रॉरंटमध्ये गेली होती. तिथे काही वेळ घालवून ती पुन्हा जहाजाच्या जाण्यासाठी निघाली होती. यावेळी खाजगी ट्रॅव्हेल्स बसमधून जाताना तिच्याशी काही कर्मचार्‍यांशी शेकहॅण्ड केले होते. त्यापैकी एका चालक कर्मचार्‍याने तिला स्वतकडे ओढत तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या पोटावरुन हात फिरवून त्याने तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन विनयभंग केला होता. या घटनेनंतर तिने त्याला जोरात ढकलले होते. त्यानंतर ती बसमध्ये जाऊन बसली होती. रात्री पावणेबारा वाजता ती जहाजावर आली होती. तिने छेड काढणार्‍या चालकाचा फोटो तिच्या मोबाईलवर काढला होता.

घडलेला प्रकार तिने तिच्या सहकार्‍यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी भारतीय नौसेनेचे लायजनिंग अधिकारी कुलविंदर सिंग आणि एन श्रीकांत यांना ही माहिती दिली. या घटनेनंतर ते सर्वजण येलोगेट पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध तक्रार करण्यासाठी आले होते. यावेळी तिने चालकाविरुद्ध तक्रार करुन त्याचा फोटो पोलिसांना शेअर केला होता. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच काही तासांत अनिल कांबळे या चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने आरोपीला ओळखून त्याने तिचा विनयभंग केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अनिल हा कांदिवलीतील दामपाडा, भीमनगर, जय भवानी चाळीतील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page