मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जून २०२४
मुंबई, – शहरात विविध घटनेत तीन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करुन त्यांचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोरेगाव, धारावी आणि कांदिवली पोलिसांनी तीन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
पहिल्या गुन्ह्यांतील ४१ वर्षांची तक्रारदार महिला ही गोरेगाव परिसरात राहत असून तिला पाच वर्षांची मुलगी आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही मुलगी परिसरातील एका मंदिराजवळून जात होती. यावेळी तिला मंदिरातील २० वर्षांच्या पुजारी तरुणाने प्रसाद देण्याचा बहाणा करुन बाजूला नेले. तिथे त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने घरी आल्यानंतर तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. या घटनेनंतर तिने मुलीसोबत गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मंदिरातील पुजार्याविरुद्ध ३५४ अ, भादवी १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तो पळून गेला होता. मात्र काही तासांत त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना कांदिवलीतील एका सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीमध्ये ४० वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून तिला पंधरा वर्षांची मुलगी आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता ही मुलगी तिच्या क्लासवरुन घरी जात होती. यावेळी याच सोसायटीमध्ये राहणार्या एका ४१ वर्षांच्या आरोपी रहिवाशाने तिचा पाठलाग करुन तिला घाबरण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार नंतर तिने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ३५४ डी भादवी सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पोलिसांनी अटक केली.
तिसरी घटना धारावी परिसरात घडली. याच परिसरात ४२ वर्षांची महिला तिच्या नऊ वर्षांच्या मुलीसोबत राहते. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही मुलगी दुकानातून समोसा आणण्यासाठी गेली होती. यावेळी त्याच परिसरात राहणार्या मोहम्मद मोकीम नावाच्या एका २५ वर्षांच्या तरुणाने तिची मान पकडून तिच्याशी अश्लील वर्तन करुन विनयभंग केला होता. दुसर्या दिवशी ही मुलगी तिच्या आईसोबत जात असताना तिला रस्त्यावर मोहम्मद मोकीम दिसला, यावेळी तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने त्याला पकडून धारावी पोलीस ठाण्यात आणले. तिथे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३५४ भादवीसह ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिन्ही आरोपींना दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.