कॉलेज तरुणीच्या विनयभंगप्रकरणी इलेक्ट्रीशियनला अटक
जवळीक साधून पाठलाग करुन अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – गिरगाव येथील एका कॉलेज तरुणीच्या विनयभंगप्रकरणी मोहम्मद मुझ्झमील मोहम्मद आलम शफी या २९ वर्षांच्या इलेक्ट्रीशियन तरुणाला गावदेवी पोलिसांनी अटक केली. तिच्याशी जवळीक साधून त्याने तिचा पाठलाग करुन तिच्याशी अश्लील चाळे तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार तरुणी ही गिरगाव येथील विल्सन कॉलेजच्या बीएच्या पहिल्या वर्षांत शिकते. बुधवारी ती नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आली होती. स्वातंत्र्यदिनाची तयारी करण्यासाठी ती कॉलेजमध्ये थांबली होती. दुपारी ती विल्सन कॉलेजच्या बाहेरील नोव्हेल्टी झेरॉक्स, मॅकिचन हॉलसमोरुन जात होती. यावेळी तिच्याकडे एक व्यक्ती एकटक पाहत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. मात्र त्याकडे तिने दुर्लक्ष केले होते. काही वेळानंतर त्याने तिचा पाठलाग करुन तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावर गेल्याने त्याने तिला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि कॉलेजच्या दिशेने पळून गेली. कॉलेजच्या सुरक्षारक्षकाला तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या सुरक्षारक्षकाने पाठलाग करुन तरुणीचा विनयभंग करणाया मोहम्मद मुझ्झमील शफी याला ताब्यात घेतले होते. ही माहिती नंतर कॉलेज प्रशासनाकडून गावदेवी पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
संशयित तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीत त्याचे नाव मोहम्मद मुझ्झमील शफी असून तो इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतो. तो नागपाड्यातील अगरबत्ती, गुलशन मेहेर इमारतीमध्ये राहत असल्याचे उघडकीस आले. या तरुणीच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ७४, ७८ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत रात्री त्याला पोलिसांनी अटक केली. गुरुवारी दुपारी त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.