पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वर्गमित्रांकडून लैगिंक अत्याचार

दोन्ही अल्पवयीन आरोपींची डोंगरीतील बालसुधारगृहात रवानगी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 मार्च 2026
मुंबई, – पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन अल्पवयीन वर्गमित्रांनी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंगासह लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंधरा आणि सतरा वयोगटातील दोन्ही आरोपीविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत रात्री उशिरा या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ते दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना बुधवारी 11 मार्चला दुपारी पावणेदोन ते सायंकाळी चारच्या सुमारास विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात घडली. पिडीत पंधरा वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत विक्रोळी येथे राहते. पंधरा आणि सतरा वर्षांचे आरोपी पार्कसाईट परिसरात राहत असून ते दोघेही तिचे वर्गमित्र आहेत. बुधवारी दुपारी पावणेदोन वाजता ती रोड क्रमांक सतराजवळ होती. यावेळी तिथे दोन्ही आरोपी आले आणि त्यांनी तिला धमकावून गुन्ह्यांच्या ठिकाणी म्हणजेच त्याच्या मित्राच्या रुममध्ये आणले होते. याच रुममध्ये पंधरा वर्षांच्या मुलाने तिच्याशी जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता.

तसेच सतरा वर्षांच्या आरोपीने रुमसह इतर ठिकाणी नेताना तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. जबदस्तीने तिचा शर्ट काढण्याचा प्रयत्न करुन तिच्याशी लैगिंक चाळे केले होते. सायंकाळी चार वाजता या दोघांनी तिची सुटका करताना हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिली होती. या प्रकारामुळे ती प्रचंड घाबरली होती. तरीही तिने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पार्कसाईट पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तिने तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची संबंधित पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांनाही विक्रोळीतून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पिडीत मुलीशी विनयभंगासह लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली. ते दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. दरम्यान पिडीत मुलीला नंतर मेडीकसाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. बुधवारी घडलेल्या या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page