मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून फसवणुक
महिलेची ७८ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटक वॉरंट करण्यात आल्याची बतावणी करुन अटकेची भीती दाखवून एका ६८ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची अज्ञात सायबर ठगांनी ७८ लाख ७० हजाराची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तीन सायबर ठगाविरुद्ध उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या सर्व बँक खात्याची माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
६७ वर्षांची वयोवृद्ध महिला ही बोरिवलीतील गोराई परिसरात राहते. ती एचपीसीएल या शासकीय तेल कंपनीतून २०१८ साली निवृत्त झाली असून तिला दरमाह पेंशन मिळते. ९ ऑक्टोंबरला तिला अजयकुमार नावाच्या एका व्यक्तीने फोन करुन तो मुंबई उच्च न्यायालयाच्या नोटीफिकेशन विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तिच्याविरुद्ध न्यायालयाचे अटक वॉरंट जारी करण्यात आले असून तिच्यावर कुठल्याही क्षणी अटकेची कारवाई होईल असे सांगितले. यावेळी तिने तिच्याविरुद्ध कुठली केस आहे याबाबत विचारणा केली असता त्याने तिच्याविरुद्ध बंगलोर पोलिसांनी मनी लॉड्रिंगचा एक गुन्हा दाखल केला आहे. तिच्या आधारकार्डसह इतर दस्तावेजाच्या आधारे बँकेत कोट्यवधी रुपयांची आर्थिक व्यवहार झाला आहे. ही रक्कम मनी लॉड्रिंगची असून तिच्यासह इतराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्याने तिचा फोन संबंधित पोलीस अधिकार्याला ट्रान्स्फर केला होता. त्यानंतर तिच्याशी विनयकुमार चौबे नाव सांगणार्या व्यक्तीने संभाषण सुरु केले. त्याने तो बंगलोर पोलीस दलात कामाला असल्याचे सांगितले. यावेळी तिने या संपूर्ण प्रकरणाशी तिचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्याने तिला स्काईप अप्स डाऊनलोड करण्यास सांगून त्याने तिची चौकशी सुरु केली होती. त्याने एका व्यक्तीचा फोटो पाठवून त्याला मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटक झाली आहे. त्याच्याकडे काही क्रेडिट कार्ड सापडले होते. त्यात एक कार्ड तिच्या नावावर असल्याचे सांगितले.
तिच्या नावाने उघडण्यात आलेल्या बँक खात्यात दोन कोटीचा आर्थिक व्यवहार झाला होता. त्यामुळे तिला चौकशीसाठी बंगलोरला यावे लागेल असे सांगितले. त्यानंतर तिला दिपाली मासिलकर या महिला अधिकार्याने संपर्क साधला होता. तिने तिच्यासह तिच्या कुटुंबियांवर कारवाईची धमकी दिली. त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल आणि याच गुन्ह्यांत शिक्षा होणार असल्याची भीती दाखविली होती. त्यानंतर तिने तिच्या बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिला चौकशीच्या नावाखाली काही रक्कम ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले. चौकशीनंतर तिच्या खात्यात ही रक्कम पुन्हा ट्रान्स्फर केली जाईल असे सांगण्यात आले. तिच्यावर विश्वास ठेवून तिने विविध बँक खात्यात सुमारे ७८ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ही माहिती नंतर या महिलेने तिच्या मुलाला सांगितली. तिच्या मुलाने तिची फसवणुक झाल्याचे सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.