बोगस अकाऊंट उघडून मॉर्फ फोटो व्हायरल करुन बदनामी
जोगेश्वरीतील घटना; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयटी कलमार्ंतत गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२४
मुंबई, – बोगस अकाऊंट बँक कर्मचारी महिलेचे मॉर्फ फोटो व्हायरल करुन तिची बदनामी झाल्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या महिलेच्या तक्रार अर्जावरुन ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत सायबर सेल पोलिसाकडून तपास सुरु आहे.
३२ वर्षांची तक्रारदार महिला ही जोगेश्वरी परिसरात राहत असून एका खाजगी बँकेत नोकरीला आहे. चार वर्षांपूर्वी तिचा विाह झाला होता. मात्र लग्नानंतर तिचे पतीसोबत क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन खटके उडू लागले. त्यामुळे त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेत कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या दोघांना कोर्टाने घटस्फोट मंजूर केला होता. त्यानंतर ती तिच्या आई-वडिल आणि भावासोबत राहण्यासाठी जोगेश्वरी येथे आली होती. पाच वर्षांपूर्वी तिचे वेगवेगळ्या नावाचे पाच इंस्टाग्राम व फेसबुक अकाऊंट होते, मात्र नंतर तिने तिचे सर्व अकाऊंट बंद केले होते. तरीही गेल्या चार वर्षांपासून अज्ञात व्यक्तीकडून तिच्या नावाने वेगवेगळ्या बोगस अकाऊंट उघडून तिचे काही फोटो व्हायरल करुन तिची बदनामीचा प्रकार सुरु होता. या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचा पूर्वीच्या मित्रासह नातेवाईकांचा समावेश होता.
ऑक्टोंबर २०२३ रोजी अज्ञात व्यक्तीने तिचे मॉर्फ केलेले काही अश्लील फोटो अपलोड केले होते. इतकेच नव्हे तर तिचे मॉर्फ फोटो तिच्या परिचितासह नातेवाईकांना पाठवून या व्यक्तीने तिची पुन्हा बदनामी सुरु केली होती. या फोटोमुळे तिची प्रचंड बदनामी झाली होती, त्यामुळे तिने राष्ट्रीय महिला आयोगासह ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार करुन संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. तिच्या तक्रार अर्जानंतर ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. प्राथमिक तपासात या महिलेच्या बदनामीमागे तिच्या परिचित व्यक्तीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे तिच्या परिचित काही लोकांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.