मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ मार्च २०२४
मुंबई, – अभिनय क्षेत्रात स्वतचे करिअर करणार्या एका २६ वर्षांच्या तरुणीचे सोशल मिडीयावर अश्लील मॉर्फ फोटोसह व्हिडीओ व्हायरल करुन तिची बदनामी झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. या तरुणीच्या तक्रारीवरुन वर्सोवा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
तक्रारदार तरुणी ही अंधेरीतील सातबंगला परिसरातील एका फ्लॅटमध्ये राहते. ती अभिनय क्षेत्रात कार्यरत असून या क्षेत्रात तिला तिचे करिअर करायचे आहे. तिचे इंटाग्रामवर एक अकाऊंट असून ती नेहमीच सोशल मिडीयावर वापर करते. सोमवारी १८ मार्चला सकाळी तिने तिचे इंटाग्राम अकाऊंट चेक केले होते. यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तहीने तिचा चेहरा असलेला अश्लील फोटो मॉर्फ करुन तो फोटो सोशल मिडीयावर अपलोड करुन एक स्टोरी पोस्ट केली होती. अशा प्रकारे तिचे दोन अश्लील मॉर्फ केलेले फोटो तिला सोशल मिडीयावर पोस्ट केल्याचे दिसून आले. ते फोटो पाहून तिला धक्काच बसला होता. संबंधित व्यक्तीने तिला इन्वाईट करुन ते फोटो तिच्या ग्रुपमधील सर्वांना दिसतील असे पोस्ट केले होते. त्यामुळे तिचे अश्लील फोटो तिच्या परिचित अनेकांनी पाहिले होते. त्यानंतर तिला सतत त्यांच्याकडून विचारणा होऊ लागली. दुसर्या दिवशी ते फोटो, व्हिडीओ आणि पोस्ट डिलीट करण्यात आले होते. मात्र या फोटोसह अश्लील पोस्टमुळे तिची सोशल मिडीयावर प्रचंड बदनामी झाली होती. त्यामुळे तिने घडलेल्या प्रकाराबाबत तिच्या मित्र-मैत्रिणीशी चर्चा करुन वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीत तिने ८ मार्च ते १८ मार्च या कालावधीत संबंधित व्यक्तीने ते मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ अपलोड करुन एक स्टोरी पोस्ट केल्याचे नमूद केले होते. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.