वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणींच्या बदनामीचा प्रकार उघड
मॉर्फ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मे २०२४
मुंबई, – वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणींच्या बदनामीचा प्रकार उघडकीस आला आहे. यातील एका तरुणीला खाजगी लोन ऍपवर स्वतची वैयक्तिक माहितीसह फोटो अपलोड करणे चांगले महागात पडले तर दुसर्या तरुणीकडे तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल न करण्यासाठी अज्ञात व्यक्तीकडून चक्क पन्नास हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी सहार आणि डी. एन नगर पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंग, खंडणीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून संमातर तपास सुरु आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार तरुणी ही तिच्या कुटुंबियांसोबत अंधेरी परिसरात राहते. तिला पैशांची गरज होती, त्यामुळे तिने एका लोन ऍपमध्ये कर्जासाठी अर्ज केला होता. अर्ज करताना तिने तिची वैयक्तिक माहितीसह फोटो आणि बँक खात्याची माहिती संबंधित लोन ऍपवर अपलोड केली होती. ही माहिती दिल्यानंतर तिला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन कॉल येऊ लागले. समोरील व्यक्ती तिच्याशी अश्लील संभाषण करत होते. याच दरम्यान तिचे मॉर्फ केलेले काही अश्लील फोटो अज्ञात व्यक्तीने तिच्या नातेवाईकांसह मित्रांना पाठविण्यात आले होते. ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल न करण्यासाठी या व्यक्तीने तिच्याकडून आठ हजार रुपये उकाळले होते. तरीही तिच्याकडे तो सतत पैशांची मागणी करत होता. सतत येणार्या कॉलला कंटाळून तिने घडलेला प्रकार डी. एन नगर पोलिसांना सांगितला. ही घटना ताजी असताना अन्य एका तरुणीने सहार पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.
ही तरुणी मूळची सोलापूरची रहिवाशी असून ती सध्या विदेशात गेली होती. तिचे सोशल मिडीयावर एक अकाऊंट असून याच अकाऊंटवरुन तिचे अज्ञात व्यक्तीने फोटो घेतले होते. ते फोटो मॉर्फ करुन त्याने तिचे अश्लील फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून दिले होते. त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. ५० हजार रुपये दिले नाहीतर तिचे मॉर्फ फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामीची धमकी देण्यात आली होती. त्याच्याकडून तिला सतत पैशांसाठी धमकी दिली जात होती. विदेशातून मुंबईत येताच तिने सहार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. प्राथमिक तपासात सोशल मिडीयासह या व्यक्तीने तिचा मोबाईल हॅक करुन तिचे दोन वर्षांपूर्वीचे फोटो मिळविले होते. या फोटोसह तिच्या मोबाईलमधील नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्यांना तिचे फोटो पाठविल्याचे उघडकीस आले आहे. या दोन्ही घटनेनंतर सहार आणि डी. एन नगर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे.