मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करुन बदनामीचा प्रयत्न
संगणक अभियंता असलेल्या तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ जुलै २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करुन एका २५ वर्षांच्या संगणक अभियंता तरुणीचा अज्ञात व्यक्तीने बदनामीचा प्रयत्न केल्याचा प्रकार भायखळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भायखळा पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या घटनेमागे तक्रारदार तरुणीच्या परिचित व्यक्तीचा सहभाग असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
तक्रारदार तरुणी ही भायखळा परिसरात तिच्या कुटुंबियंसोबत राहते. नवी मुंबईतील घनसोली परिसरातील एका खाजगी कंपनीत ती संगणक अभियंता म्हणून कामाला आहे. शनिवारी तिला सुट्टी होती, त्यामुळे ती दिवसभर घरातच होती. सायंकाळी साडेसहा वाजता तिला तिच्या एका मित्राचा फोन आला. त्याने तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचे सांगून तिचा मॉर्फ केलेल्या फोटोचा स्क्रिनशॉट तिला पाठवून दिले होते. त्यामुळे तिने या फोटोची पाहणी केली असता तिला एका वेबसाईटवर तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल झाल्याचे दिसून आले. या घटनेनंतर तिने एका वेबसाईटवर अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. घडलेला प्रकार तिने पालकांना सांगितला. त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने भायखळा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ३५६ (२) भारतीय न्याय संहिता सहकलम ६७, ६७ (अ) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत.