तिकिट कन्फर्मेशनसाठी खासदाराच्या नावाने बोगस शिफारसपत्र
बोगस लेटरहेडचा वापर केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 जून 2025
मुंबई, – नांदेडला जाणार्या देवग्राम एक्सप्रेसच्या तिकिट कन्फर्मेशनसाठी खासदार सुरेश गोपीनाथ म्हाडे ऊर्फ बाळ्या मामा यांच्या नावाने बोगस शिफारसपत्र पाठवून खासदारासह रेल्वे प्रशासनाची फसवणुक करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोगस लेटरहेडवर खासदाराची स्वाक्षरी आणि शिक्का वापरुन फसवणुक केल्याप्रकरणी सईद एजाज या व्यक्तीविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.
आकाश मनोज पाटील हे भिवंडीचे रहिवाशी असून व्यवसायाने वकिल आहेत. सध्या ते भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे मतदारसंघातील रेल्वेबाबतचे कामकाज आणि निर्माण होणार्या समस्याचे बाळ्या मामा यांच्या मार्गदर्शनाखाली निरसण करणे आदी कामाची जबाबदारी आहे. खासदाराच्या नावे रेल्वेमध्ये ठराविक कोटा रिझर्व्ह असतो. त्यामुळे ते त्यांच्या गरजू कार्यकर्त्यांना खासदाराच्या लेटरहेडवर शिफारसपत्र देतात. त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी ते सीएसएमटीचे सहाय्यक कमर्शियल मॅनेजर सुभाष यांच्या संपर्कात असतात.
31 मेला सुभाष यांना बाळ्या मामा यांच्या लेटरहेडवरील एक शिफारसपत्र मिळाले होते. त्यात खासदाराच्या नावासह स्वाक्षरी, शिक्का होता. ते पत्र केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्या नावाने नगरपरिषदेचे सभासद सईद एजाज याच्यासाठी आला होता. त्यात त्याच्या नांदेड येथे जाणार्या देवग्राम एक्सप्रेसची खासदार कोट्यातून तिकिट कन्फर्मेशनचा उल्लेख होता. या पत्राबाबत संशय निर्माण झाल्याने सुभाष यांनी आकाश पाटील यांना संपर्क साधून ते पत्र व्हॉटअपवर पाठविले होते. ते पाहिल्यानंतर संबंधित शिफारसपत्र बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते, त्यातील जावक क्रमांक बोगस होता.
या पत्राची तारीख 30 मे होती, मात्र खासदार बाळ्या मामा विदेशात असल्याने त्यांनी ते पत्र देण्याचा संबंध नव्हता. सईद एजाज याने खासदाराच्या नावाने बोगस शिफारसपत्र बनवून त्यांची बोगस स्वाक्षरी आणि शिक्का मारला होता. या पत्राद्वारे त्याने स्वतची देवग्राम एक्सप्रेसची तिकिट खासदार कोट्यातून कन्फर्मेशनसाठी पाठविले होते. ते पत्र नंतर खासदार बाळ्या मामा यांना दाखविण्यात आले होते, यावेळी त्यांनी पत्रावरील स्वाक्षरी त्यांची नसल्याचे सांगून संबंधित व्यक्तीविरुद्ध आकाश पाटील यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आकाश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात सईद एजाज या व्यक्तीविरुद्ध खासदाराच्या नावाने बोगस शिफारसपत्र बनविल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.