बोगस दस्तावेज बनवून पॉलिसीच्या साडेबारा लाखांचा अपहार
वयोवृद्धाच्या तक्रारीवरुन आरोपी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मार्च 2026
मुंबई, – पॉलिसीच्या सुमारे साडेबारा लाखांचा अपहार करुन बोगस दस्तावेज बनवून एका वयोवृद्धाची फसवणुक झाल्याचा प्रकार फोर्ट परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रिया सौरव मिश्रा आणि सौरव मिश्रा अशी या आरोपी पती-पत्नीचे नाव असून यातील प्रिया मिश्रा ही तक्रारदाराकडे रिलेशनशीप मॅनेजर म्हणून कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही आरोपींची लवकरच पोलिसाकडून चौकशी होणार आहे. त्यांना चौकशीसाठी पोलिसांकडून समन्स बजाविले जाणार आहे.
श्रीकांत गणपती प्रभू हे 63 वर्षांचे तक्रारदार नालासोपारा येथे रहत असून ते सध्या निवृत्त झाले आहेत. एप्रिल 2022 पासून त्यांच्याकडे प्रिया मिश्रा ही रिलेशनशीप मॅनेजर म्हणून कामाला होता. त्यांच्या सर्व व्यवहाराची जबाबदारी तिच्यावर होती. कामात हुशार असल्याने त्यांचा प्रियावर प्रचंड विश्वास होता. श्रीकांत प्रभू यांची एक पॉलिसी सुरु होती. या पॉलिसीची रक्कम ते प्रियाच्या माध्यमातून त्यांच्या फोर्ट येथील बँकेतून भरत होते. एप्रिल 2022 ते मार्च 2026 या कालावधीत त्यांनी पॉलिसीचे हप्ते भरण्यासाठी प्रियाला सुमारे साडेबारा लाख रुपये दिले होते.
ही रक्कम पॉलिसी कार्यालयात जमा केल्याची बोगस पावती बनवून तिने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ही रक्कम तिथे जमा न करता प्रियाने तिचा पती सौरव मिश्राच्या मदतीने सुमारे साडेबारा लाखांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती. इतकेच नव्हे तर त्यांची फसवणुक करण्याच्या उद्देशाने या आरोपी पती-पत्नीने बोगस नोटरी केलेले लोन अग्राीमेंट आणि नोटरी केलेले एमओयू बनवून त्या कागदपत्रांवर श्रीकांत प्रभू यांची स्वाक्षरी घेतली होती.
अशा प्रकारे त्यांनी त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार अलीकडेच त्यांच्या लक्षात आला होता. याबाबत त्यांनी प्रियासह तिचा पती सौरव मिश्राकडे विचारणा करुन त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र या दोघांनी पैसे परत करतो असे सांगून दिलेल्या मुदतीत त्यांना पैसे दिले नाही. त्यानंतर या दोघांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले, त्यांचा कॉल ब्लॉक केला होता.
या घटनेनंतर श्रीकांत प्रभू यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रिया मिश्रा आणि सौरव मिश्रा या दोघांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पॉलिसीच्या रक्कमेचा परस्पर अपहार करुन तक्रारदार वयोवृद्धाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.