चित्रकार एस. एच रझा यांचे अडीच कोटीचे चित्र चोरीला
अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० सप्टेंबर २०२४
मुंबई, – प्रसिद्ध चित्रकार एस. एच रझा यांनी बनविलेले आणि ऑक्शनमध्ये ठेवण्यात आलेले सुमारे अडीच कोटीचे महागडे चित्र अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची घटना फोर्ट परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून या गुन्ह्यांचा संमातर तपास स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला करण्याचे आदेश दिले होते. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिद्धांत महेश शेट्टी हे अंधेरीतील ओशिवरा, आदर्शनगर परिसरात राहतात. ते एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्या कंपनीचे फोर्ट येथील बेलार्ड पिअर, ग्यान भवनच्या तळमजल्यावर गुरु ऑक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेडचे गोदाम आहे. याच गोदामात प्रसिद्ध चित्रकार एस. एच रझा यांनी १९९२ साली प्रकृती नावाच्या ऍक्रेलिक ऑन कनव्हासवर बनविलेले सुमारे अडीच कोटीचे चित्र ऑक्शनमध्ये ठेवले होते. २४ मार्च २०२२ ते ३० मे २०२४ या कालावधीत त्यांच्या कंपनीच्या गोदामात प्रवेश करुन अज्ञात व्यक्तीने अडीच कोटीचे ऑक्शनमध्ये ठेवलेले चित्र चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार अलीकडेच कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर या अधिकार्यांनी कंपनीच्या वतीने सिद्धांत शेट्टी यांना पोलिसात तक्रार करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सिद्धांत शेट्टी यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला आहे. गेल्या काही महिन्यांतील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपीची ओळख पटवून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.