मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 सप्टेंबर 2025
मुंबई, – गोरेगाव येथे महानगर टेलिफोन निगम लिमिटेडची केबल वायर चोरीची घटना ताजी असताना जोगेश्वरी येथे सुमारे 58 लाखांची ड्रेनेज डकटमधून केबल वायर चोरी करणार्या एका टोळीचा आंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला. यावेळी केबल वायर चोरी करताना आठजणांच्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. अटक आरोपींमध्ये शुभम अशोक गोलीपकर, मनोज निरंजन पासवान, संदीप शिवशंकर सोनी, मिलन मिथलेश सिंह, अब्दुल आहात सेलाब खान, नफिस मोबीन खान यांच्यासह इतर दोघांचा समावेश आहे. अटकेनंतर आठही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीच्या एमटीएनएल केबल वायर चोरीच्या काही गुन्ह्यांची उकल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथे एमटीएनएल वायरची चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार उघडकीस येताच अज्ञात व्यक्तीविरुद्ध एमटीएनएलच्या वतीने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. हा तपास सुरु असताना मंगळवारी रात्री उशिरा आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने जोगेश्वरीतील एका नामांकित शाळेजवळ काहीजण ड्रेनेज डकटमधून एमटीएनएल केबल वायरची चोरी करताना दिसून आले. यावेळी तिथे आलेल्या सहाजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनी ते सर्वजण एमटीएनएल कंपनीचे कर्मचारीअसून तिथे काम सुरु असल्याचे सांगून पोलिसांशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा केबल वायर चोरीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. चौकशीत ही टोळी सुमारे 58 लाखांची केबल वायरची चोरी करुन पलायन करणार होती, मात्र त्यापूर्वीच या सर्वांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या सहाजणांची त्यांच्या इतर दोन सहकार्यांची नावे सांगितली होती.
या पथकाने उशिरा त्यांच्या अन्य सहकार्यांना अटक केली. या आठजणांविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर बुधवारी दुपारी त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टात पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.