तीस वर्षापूर्वीची 21 लाखांची कॉपर केबल वायरची चोरी

एमटीएनएलच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 ऑगस्ट 2025
मुंबई, – तीस वर्षापूर्वीची महानगर टेलिफोन निगम लिमिटेची अंडरग्राऊंड कॉपर केबल वायर चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. 21 लाख 60 हजार रुपयांच्या केबल वायर चोरीनंतर एमटीएनएलच्या वतीने गोरेगाव पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु केला आहे.

ही घटना मंगळवारी रात्री दोन ते तीनच्या सुमारास गोरेगाव येथील एस. व्ही रोड, नाना-नानी पार्क ते इमेज हॉटेल दरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले. जुनैद मोहम्मद खान हे महानगर टेलिफोन निगम लिमिटेडमध्ये उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते गोरेगाव येथील एमटीएनएल कार्यालयात कार्यरत असून त्यांच्यावर गोरेगाव आणि मालाड येथील कार्यालयातील टेलिफोन लाईन, त्यांच्या सायबर लाईनच्या मेंटेन्सन्सची जबाबदारी आहे.

सोमवारी सायंकाळी काम संपवून ते त्यांच्या गोरेगाव येथील सुंदरनगरातील शासकीय निवासस्थानी निघून गेले होते. यावेळी त्यांना सुमेरी कुरील या मॅकनिकने कॉल करुन गोरेगाव येथील पाटकर कॉलेजजवळ एमटीएनएलच्या कॉपर केबल वायरची चोरी होत असल्याची माहिती दिली होती. या माहितीनंतर ते त्यांच्या सहकार्‍यासोबत घटनास्थळी रवाना झाले होते. यावेळी त्यांना तिथे एमटीएनएलच्या 21 लाख 60 हजार रुपयांच्या कॉपर केबल वायरची चोरी झाल्याचे दिसून आले.

रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तींनी संबंधित वायर चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या तीस वर्षापूर्वी अंडरग्राऊंड वापरलेले कॉपर केबल वायर चोरी गेल्याने त्यांनी ही माहिती त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली होती. त्यांच्या आदेशानंतर त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एमटीएनएलच्या कॉपर केबल वायरची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत गोरेगाव पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर या पथकाने या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page