एमटीएनएल केबल वायर चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

सुमारे वीस लाखांच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 डिसेंबर 2025
मुंबई, – कांदिवलीतील चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत महानगर टेलिफोन निगम लिमिटेड कंपनीची केबल वायर चोरी करणार्‍या एका टोळीचा मालाड पोलिसांनी पर्दाफाश केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण व त्यांच्या पथकाने रात्रीच्या वेळेस गस्त घालताना ही कारवाई करुन पाच आरोपींना शिताफीने पाठलाग करुन अटक केली तर त्यांचे पंधरा ते वीस सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. अटक आरोपींमध्ये तन्वीर मुखशेर शेख, आदित्य शापुदिन अन्सारी, अब्रार कादर शेख, आश्विन बाबू सूर्यवंशी आणि जाफर मुन्ना शेख यांचा समावेश असून ते सर्वजण भांडुपचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईल एका टाटा कंपनीचा टेम्पो, एक होंडा युनिकॉर्न बाईक, कटर असा सुमारे वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटकेनंतर पाचही आरोपींना चारकोप पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर पाचही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

शनिवारी रात्री मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण हे नाईट राऊंड कर्तव्यावर गस्त घालत होते. रात्री पावणेदोनच्या सुमारास दुष्यंत चव्हाण व त्यांचे सहकारी कांदिवलीतील चारकोप रोडवरुन मालवणी पोलीस ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. कॅप्सुल कंपनीसमोरुन जात असताना या पथकाला तिथे 20 ते 25 इसम एमटीएनएलची केबल वायर चोरी करत असल्याचे दिसून आले. मात्र पोलीस व्हॅन पाहताच ते सर्वजण पळू लागले. यावेळी दुष्यंत चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी पळून जाणार्‍या आरोपींचा पाठलाग करुन काही अंतरावर पाचजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. घटनास्थळी उभ्या असलेल्या टेम्पोची पाहणी केल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना एमटीएनएल केबलच्या प्रत्येकी दहा फुट लांबीचे आणि तीन इंच व्यासाचे 80 ते 90 तुकडे टेम्पोत भरल्याचे दिसून आले. तसेच बाजूला तीन मोठे कटर्स सापडले.

सुरुवातीला या पाचजणांनी ते एमटीएनएलचे कर्मचारी असल्याचे सांगून स्वतचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र चौकशीनंतर त्यांनी केबल वायरची चोरी करत असल्याची कबुली दिली. पाचही आरोपींना नंतर चारकोप पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. चौकशीत त्यांची नावे तन्वीर शेख, आदिल अन्सारी, अब्रार शे, आश्विन सूर्यवंशी आणि जाफर शेख असल्याचे उघडकीस आले. ते सर्वजण भांडुप परिसरात राहत असून एमटीएनएल केबल वायर चोरी करणारे सराईत गुन्हेगार असल्यासचे उघडकीस आले. त्यांच्याकडून केबल वायरसह टेम्पो, एक बाईक, मोबाईल आणि इतर साहित्य असा सुमारे वीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

केबल वायर चोरी केल्याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्यांना नंतर अटक करण्यात आली. सध्या ते सर्वजण पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीत त्यांच्या इतर सहकार्‍यांची नावे समोर आली असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे. या टोळीविरुद्ध मुंबईसह इतर शहरात अशाच प्रकारचे काही गुन्हे दाखल असल्याचे बोलले जाते. त्यांच्या अटकेने काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रात्री गस्त घालत असताना हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे वीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी चारकोप पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page