डंपरची धडक लागून 75 वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू

मुलुंड येथील अपघातप्रकरणी डंपरचालकास अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मार्च 2026
मुंबई, – रिव्हर्स घेताना डंपरची धडक लागून झालेल्या अपघातात रविंद्र दत्तात्रय राणे या 75 वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी मुलुंड परिसरात घडली. या अपघाताला जबाबदार असलेल्या डंपरचालक उस्मान इक्बाल अहमद शाह याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा अपघात सोमवारी 23 मार्चला सकाळी अकरा वाजता मुलुंड येथील संत तुकाराम रोड, गणेश टॉकिजसमोरील गल्ली, निलकंठ सोसायटीसमोरील रस्त्यावर झाला. रोहिदास विठ्ठल गावित हे कल्याण येथे राहत असून सध्या नवघर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी 23 मार्चला ते सकाळी आठ वाजता ड्यूटीवर हजर झाले होते. त्यानंतर ते त्यांच्या सहकार्‍यासोबत मोबाईल एक गाडीवर परिसरात गस्त घालत होते. सकाळी अकरा वाजता या पथकाला गणेश टॉकिजसमोरील गल्ली, निळकंठ सोसायटीसमोरील रस्त्यावर अपघात झाल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीनंतर पोलीस पथक तिथे रवाना झाले होते. यावेळी पोलिसांनी स्थानिक रहिवाशांनी 108 क्रमांकावर कॉल करुन रुग्णवाहिनेतून जखमी वयोवृद्धाला जवळच्या वीर सावरकर हॉस्पिटलमध्ये पाठविल्याचे समजले. त्यानंतर पोलीस पथक हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे त्यांना निळकंठ सोसायटीसमोरील रस्त्यावर आरोपी चालक उस्मान शाह हा त्याचा डंपर रिव्हर्स घेत होता. यावेळी चालकाला दिशा सांगण्यासाठी कोणीही व्यक्ती त्याच्यासोबत नव्हता.

याच दरम्यान रस्त्यावरुन जाणार्‍या एका वयोवृद्धाला त्याने धडक दिली होती. त्यांच्या दोन्ही पायासह उजव्या हातावर डंपरचे चाक गेल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना वीर सावरकर हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. स्थानिक रहिवाशांनी डंपरचालक उस्मान शाह याला ताब्यात घेतले होते. त्याला नंतर पुढील कारवाईसाठी नवघर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.

याप्रकरणी रोहिदास गावित यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हलगर्जीपणाने डंपर चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी उस्मान शाहविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. चौकशीदरम्यान मृत वयोवृद्धाचे नाव रविंद्र राणे असल्याचे उघडकीस आले. ते मुलुंडच्या नाणेपाडा, मिठागर रोड, पालखी सोसायटीमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते.

हॉस्पिटलमध्ये त्यांचा मुलगा शौनक राणे हा उपस्थित होता, त्याचीही नंतर पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. रविंद्र यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, उपचारादरम्यान दुपारी साडेबारा वाजता त्यांचे निधन झाल्याचे डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले. रविंद्र राणे यांच्या अपघाती निधनाने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page