चांगला परताव्याच्या आमिषाने अनेक गुंतवणुकदारांची फसवणुक
3.16 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2025
मुंबई, – चांगला परताव्याच्या आमिषाने अनेक गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक करुन एका खाजगी कंपनीच्या मालकाने पलायन केल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जितेंद्र महादेव यादव या मालकाविरुद्ध मुलुंड पोलिसाीं अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून तो सांगलीच्या इस्लामपूरा, वाळवा, बनेवाडीचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत पोलिसांकडे 24 गुंतवणुकदारांची तक्रार प्राप्त झाली असून त्यांच्या तक्रारीवरुन त्याने संबंधितांची तीन कोटी सोळा लाखांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जितेंद्रकडून फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी मुलुंड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आला आहे.
वैभव शामसुंदर कर्ले हे अंबरनाथचे रहिवाशी असून तो त्याच्या वडिलांसह भावासोबत राहतो. ऑक्टोंबर 2019 रोजी त्यांच्या वडिलांच्या मित्रांनी मुलुंड येथील एन. एस रोड, साई आर्केटमध्ये असलेल्या कॅपिटल गेन फायनान्सियल या कंपनीची माहिती सांगितली होती. या कंपनीचे मालक जितेंद्र यादव असून कंपनीच्या गुंतवणुकदारांना चांगला परवाता देतो. त्याच्या कंपनीत अनेकांनी गुंतवणुक केली असून त्यांना चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळे या मित्राने त्यांनाही संंबंधित कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून वैभव, त्याचा भाऊ रोहन आणि वडिल शामसुंदर कर्ले यांनी ऑगस्ट 2020 ते डिसेंबर 2021 या कालावधीत टप्याटप्याने साडेनऊ लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर कंपनीकडून त्यांना वर्षभर परताव्याची रक्कम मिळाली होती. मात्र नंतर कंपनीने व्याजाची रक्कम देणे बंद केे होते.
याबाबत त्यांनी जितेंद्र यादवची भेट घेतली असता त्याने त्यांना कंपनी अडचणीत असल्याचे सांगून त्यांच्याकडे काही दिवसांची मुदत मागून घेतली होती. त्यांना त्यांच्या गुंतवणुकीसह व्याजाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याने दिलेले आश्वासन पाळले नाही. तो कंपनी बंद करुन त्याच्या सांगलीच्या गावी पळून गेला होता. त्यामुळे ते त्याच्या गावी गेले होते. यावेळी तो तिथे नव्हता. मुंबईत आल्यानंतर त्यांना त्यांच्याप्रमाणे इतर काही गुंतवणुकदार सापडले होते. जवळपास 21 गुंतवणुकदारांकडून त्याने कोट्यवधी रुपये घेतले होते, मात्र काही महिने परताव्याची रक्कम देऊन त्याने त्यांना व्याजाची रक्कम देणे बंद केले होते.
चौकशीदरम्यान जितेंद्र यादवने जानेवारी 2020 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत कर्ले कुटुंबियांसोबत इतर 21 गुंतवणुकदारांकडून 3 कोटी 99 लाख 92 हजार 787 रुपये गुंतवणुकीसाठी घेतले होते. त्यापैकी 84 लाख 7 हजार रुपये त्याने परवाता म्हणून गुंतवणुकदारांना परत केले होते. उर्वरित 3 कोटी 16 लाखांचा परस्पर अपहार करुन गुंतवणुकदारांची फसवणुक करुन तो पळून गेला होता. हा प्रकार उघडकीस येताच या सर्व गुंतवणुकदारांनी मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी जितेंद्र यादव याच्याविरोधात तक्रार केली होती.
याप्रकरणी वैभव कर्ले याच्या तक्रारीवरुन जितेंद्र यादवविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत मुलुंड पोलिसांना आरोपीच्या अटकेचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेचे अधिकारीही करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.