बँक खात्यातून 50 लाखांचा अपहार करुन व्यावसायिकाची फसवणुक
अकाऊंट महिलेसह तिच्या पतीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2026
मुंबई, – अकाऊंटट म्हणून काम करताना आपल्या पदाचा गैरवापर करुन एका महिलेने ड्रायफ्रुट व्यावसायिक मालकाच्या दोन शॉपच्या बँक खात्यातून सुमारे 50 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याची धक्कादायक घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पूजा भारत पटेल ऊर्फ पूजा चावडा आणि भारत जयंतीभाई चावडा या आरोपी पती-पत्नीविरुद्ध नवघर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांत दोघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विजय भवन चौधरी हे व्यावसायिक असून ते मुलुंडच्या निलमनगर, संस्कृती अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा स्वतचा हरिओम ड्रायफ्रुट अॅण्ड स्वीट आणि हरिओम फुट कोर्ट नावाचे मुलुंड परिसरात दोन शॉप आहे. या दोन्ही शॉपच्या व्यवहाराची जबाबदारी त्यांच्यासह त्यांचे वडिल भवन चौधरी आणि भाऊ संजय चौधरी असे तिघेही मिळून पाहतात. त्यांच्याकडे पूजा पटेल ही अकाऊंटट म्हणून काम करत होती. जुलै 2023 पासून ती त्यांच्याकडे कामाला होती. तिच्यावर आर्थिक सर्व व्यवहाराची जबाबदारी होती. कामात हुशार असल्याने तिच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. त्यासाठी तिला दरमाह वीस हजार रुपये पगार दिला जात होता.
21 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी तिला त्यांच्या हरिओम फुट कोर्ट या बँक खात्यात पन्नास हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले होते. मात्र ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांचे मॅनेजर लक्ष्मण देवडा यांना व्यवहाराची पाहणी करण्यास सांगितले होते. यावेळी त्यांना ती रक्कम त्यांचे वेंडर नसलेले हरदिप सिंग याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. हा व्यवहार संशयास्पद वाटताच लक्ष्मण देवडा यांनी दोन्ही शॉपच्या गेल्या दोन वर्षांतील आर्थिक व्यवहाराची पाहणी केली होती. या पाहणीत त्यांना त्यांच्या जुने वेंडर, सध्याचे वेंडर आणि वेंडर नसलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले.
या वेंडरच्या नावावर असलेले लिंक असलेले बँक खाते तपासल्यानंतर पूजा पटेल आणि तिचे पती भारत चावडा यांच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पूजाकडे विचारणा केली होती, यावेळी तिने काहीही उत्तर दिले नाही. तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करणार असल्याची धमकी देताच तिनेच तिच्या पतीच्या मदतीने गेल्या दोन वर्षांत दोन्ही शॉपच्या बँक खात्यातून तिच्यासह तिच्या पतीच्या बँक खात्यात सुमारे 50 लाख रुपये ट्रान्स्फर केल्याची कबुली दिली.
दोन्ही बँक खात्यातून तिने अनुक्रमे 28 हजार 83 हजार 692 व 21 हजार 23 हजार 757 रुपये ट्रान्स्फर केल्याचे बँक स्टेटमेंटवरुन उघडकीस आले होते. पूजाने अकाऊंटट म्हणून काम करताना स्वतच्या वैयक्तिक फायद्यासाठी विजय चौधरी यांच्या दोन्ही शॉपच्या बँक खात्यातून परस्पर 50 लाखांचा अपहार करुन फसवणुक केली होती. या प्रकारानंतर विजय चौधरी यांनी नवघर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पूजा पटेल ऊर्फ चावडा आणि तिचा पती भारत चावडा या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पूजा ही तिचा पती भारत पटेल याच्यासोबत ठाण्यातील किसननगर क्रमांक तीन, द्रोणागिरी सोसायटीच्या दुसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 202 मध्ये राहत असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत या दोन्ही पती-पत्नीची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.