टाटा स्टिलच्या नावाने व्यावसायिकाची नऊ लाखांची फसवणुक
सोळा टनसाठी पैशांचा अपहार करणार्या सायबर ठगाविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 जून 2025
मुंबई, – सोशल साईटवर टाटा स्टिल लिमिटेड या कंपनीची बोगस लिंक अपलोड करुन मुलुंडच्या एका कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोळा टनसाठी सुमारे नऊ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी या ठगाविरुद्ध मुलुंड पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांत स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत असल्याचे सांगण्यात आले.
गोपाळ मारुती कडव हे मुलुंडचे रहिवाशी असून त्यांची स्वतची जी. पी कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी आहे. त्यांच्या कंपनीतर्फे सत्याधाम विद्यापीठ रोडजवळील मारुती इमारतीचे कन्स्ट्रक्शन काम सुरु आहे. त्यासठी त्यांना टाटा स्टिल डिलरची माहिती हवी होती. त्यामुळे त्यांनी गुगलवर टाटा स्टिल डिलरची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना टिाटा टिस्कॉन असे कंपनीचे दिसून आले. ती लिंक ओपन केल्यानंतर त्यात त्यांना मोबाईल क्रमांक दिसला. त्यामुळे त्यांनी त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी समोरुन मयांक अग्रवाल नावाच्या व्यक्तीने तो टाटा टिस्कॉन कंपनीच्या सेल्स विभागातील अधिकारी असल्याचे सांगितले होते.
यावेळी त्यांनी त्याच्याकडे टाटा स्टिलविषयी माहिती विचारली होती. त्यांना सोळा टन स्टिलची आवश्यकता होती. त्यामुळे मयांकने त्यांना टाटा स्टिलचे सुमारे नऊ लाखांचे कोटेशन पाठविले होते. ही रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा होताच त्यांना टाटा स्टिलची डिलीव्हरी केली जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर त्याने टाटा स्टिल लिमिटेड नावाच्या बँक खात्याचे डिटेल्स पाठविली होती. ती टाटा स्टिल कंपनी असल्याचे समजून त्यांनी सोळा टन टाटा स्टिलसाठी संबंधित बँक खात्यात सुमारे नऊ लाखांचे पेमेंट आरटीजीएसद्वारे ट्रान्स्फर केले होते.
पेमेंट केल्यानंतर त्यांनी मयांकला 27 मेला टाटा स्टिलची डिलीव्हरी करण्याची विनंती केली होती. मात्र त्याने स्टिलची डिलीव्हरी केली होती. विचारणा केल्यानंतर मयांकने त्यांना आणखीन स्टिल विकत घ्यावे लागेल असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी गोरेगाव येथील कंपनीच्या पत्त्याबाबत चौकशी केली होती. यावेळी ही कंपनी बोगस असल्याचे उघडकीस आले. टाटा स्टिल लिमिटेड या बोगस नावाने सोशल मिडीयावर खोटी लिंक ठेवून या सायबर ठगाने त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मुलुंड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर पोलिसांनी मयांक अग्रवाल या सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या ठगाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तसेच ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.