रॉबरीचा बनाव करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न

तक्रारदरालाच रॉबरीच्या गुन्ह्यांत अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ जानेवारी २०२५
मुंबई, – रॉबरीचा बनाव करुन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आले. तक्रारदार जबानीत विसंगत माहिती देत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी पोलिसी इंगा दाखवून त्यानेच आपण रॉबरीचा बनाव केल्याची कबुली दिली. त्यामुळे तक्रारदारालाच रॉबरीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अमीत रामअशिष गुप्ता असे या २१ वर्षीय आरोपी तरुणाचे नाव असून अटकेनंतर त्याला मुलुंड येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

अमीत गुप्ता हा भांडुपच्या टेंभीपाडा, सुखराम शेठ चाळीत राहतो. मुलुंडच्या विर संभाजी नगर पाईपलाईन परिसरातील युनिटी शेअर सर्व्हिस या खाजगी कंपनीत कामाला आहे. २० जानेवारीला त्याला कंपनीतील ८७ हजार ७९० रुपयांची कॅश बँकेत भरण्यासाठी देण्यात आली होती. त्यामुळे तो कंपनीतून बँकेत जाण्यासाठी निघाला होता. मात्र बँकेत जाताना त्याला मारहाण करुन अज्ञात व्यक्तींनी त्याच्याकडील कॅश चोरी करुन पलायन केले होते. या प्रकारानंतर त्याने घडलेला प्रकार मुलुंड पोलिसांना सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी रॉबरीचा गुन्हा दाखल केला होता.

या तक्रारीची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मोरे यांनी मुलुंड पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी, पोलीस निरीक्षक नितीन खाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते, पोलीस हवालदार किरण चव्हाण, पोलीस शिपाई सुनिल विंचू, शेखर बाविस्कर, मनोज मोरे, मोहन निकम, विवेक शिंपी यांनी तपास सुरु करुन परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेज पोलिसांना काहीही संशयास्पद दिसून आले नाही.

त्यामुळे अमीत गुप्ताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून घडलेल्या घटनेचा वारंवार माहिती काढण्याचा प्रयत्न केला, यावेळी तो प्रत्येक वेळेस विसंगत माहिती देत होता. त्याच्यावर पोलिसाना संशय आला होता. त्यामुळे त्याला पोलिसी इंगा दाखविताच त्यानेच रॉबरीचा बनाव करुन आपण पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याकडून चोरीची सर्व कॅश पोलिसांनी जप्त केली आहे.

रॉबरीची खोटी तक्रार करुन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांतील कंपनीच्या कर्मचारी असलेल्या तक्रारदारालाच पोलिसांनी आरोपी म्हणून अटक केल्यानंतर त्याच्या सहकार्‍यांना धक्काच बसला होता. अटकेनंतर त्याला मुलुंड येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page