घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन चोरट्याची हातसफाई
मुलुंड येथील घटना; सोळा लाखांचा मुद्देमाल पळविला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मे २०२४
मुंबई, – घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन बंद फ्लॅटचा कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन कपाटातील सुमारे सोळा लाखांचा मुद्देमाल पळवून नेला. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु आहे. प्राथमिक तपासात सोळा लाखांची घरफोडी झाल्याचे नमूद करण्यात आले तरी अंदाजे २६ लाखांचा मुद्देमाल चोरट्याने पळविल्याचे बोलले जाते.
भैरवी परेश कोटक ही तरुणी मुलुंडच्या एम. जी रोडवरील गायवाला इमारतीच्या वसंत निवासमध्ये तचे वडिल परेश आणि आई रिटा यांच्यासोबत राहते. तिच्या वडिलांचा फरसाण विक्रीचा व्यवसाय आहे तर ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. गुरुवारी २३ मेला तिचे आई-वडिल, तिची बहिण तन्वी ठक्कर, डिंपल चंदन यांच्या कुटुंबियांसोबत गोवा येथे फिरायला गेले होते. यावेळी घरात भैरवी ही एकटीच होती. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली होती. कामावरुन ती सायंकाळी चेंबूर येथील तिच्या एका मैत्रिणीकडे गेली होती. रात्री उशिर झाल्याने तिने तिथेच मुक्काम केला होता. शनिवारी दुपारी दोन वाजता ती घरी आली होती. यावेळी तिला तिच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने आत प्रवेश करुन पाहणी केली असता तिला तिच्या चोरी झाल्याचे दिसून आले. सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील विविध सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपयांची कॅश असा सुमारे सोळा लाखांचा मुद्देमाल चोरट्याने पळवून नेला होता.
स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी भैरवी कोटक हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सोळा लाखांच्या घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तिचे आई-वडिल गोवा येथे गेले आहे. ते परत आल्यानंतर घरातील नक्की किती रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला याबाबत सांगता येईल असे तिने तिच्या जबानीत सांगितले आहे. अंदाजे २६ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु आहे.