मुलुंड येथे फ्लॅटमध्ये प्रवेश करुन २१ लाखांची घरफोडी
सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळालेल्या आरोपींचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – मुलुंड येथे एका बंद फ्लॅटमध्ये प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु केला आहे.
ही घटना २० डिसेंबर २०२४ ते ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत मुलुंड येथील नवघर रोड, गोपाळ कृष्ण सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या तळ मजल्यावरील फ्लॅट क्रमांक दोनमध्ये निशा नारायण शिरसाट ही महिला एकटीच राहते. तिची आई सुशलिा ही महानगरपालिकेतून निवृत्त झाली असून पाच वर्षांपूर्वी तिचे निधन झाले होते तर तिचे वडिल नारायण शिरसाट व भाऊ नितीन हे दोघेही ठाण्यातील श्रीनगर परिसरात राहतात. ती डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जी येथे डायरेक्टरेट ऑफ पर्चेस ऍण्ड स्टोअर्समध्ये कामाला होती. मात्र प्रकृती ठिक नसल्याने तिने स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. जून २०२४ पर्यंत ती नमूद पत्त्यावर राहत होती, मात्र ही इमारत मोडकळीस आल्याने ती पुर्नविकासासाठी गेली होती. त्यामुळे तिने तिचे सामान पॅक केले होते.
सध्या ती मुलुंडच्या गव्हाणपाडा, मनिषा अपार्टमेंटमध्ये राहत होती. ७ फेब्रुवारीला तिला तिच्या स्थानिक रहिवाशांनी तिच्या फ्लॅटचा मागील दरवाजा उघडा असल्याची माहिती सांगितली होती. त्यामुळे ती तिच्या घरी गेली होती. यावेळी तिला तिच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले. फ्लॅटमध्ये कोणीही राहत नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला होता. तिच्या घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करुन विविध हिरेजडीत सोन्याचे, चांदीचे दागिने, नाणी, कॅमेरा, घड्याळ तसेच इतर मौल्यवान सामान असा २१ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर तिने नवघर पोलिसांना ही माहिती दिली होती.
या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्राथमिक तपासात फ्लॅटचे दोन्ही कड्या कापलेले होते. दरवाज्याचा पत्रा उचकटलेला होता. फ्लॅटमध्ये प्रवेश करुन चोरट्यांनी सर्व सामानातून मौल्यवान वस्तू चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी निशा शिरसाट यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.