मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत काकांनी लैगिंक अत्याचार करुन हा प्रकार कोणाला सांगू नकोस म्हणून तिच्यासह तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी काकाला मुलुंड पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
४९ वर्षांचे तक्रारदार पुजारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मुलुंड परिसरात राहतात. त्यांची दहा वर्षांची पिडीत मुलगी असून आरोपी त्यांचा चुलत भाऊ आहे. १५ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत त्याने त्यांच्या मुलीला घरातील पोटमाळ्यावर बोलावून तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. दोन दिवसांपूर्वी तिने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितली होती. तिच्याकडून ही माहिती ऐकून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी चुलत भावाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपी भावाविरुद्ध पोलिसांनी ६४ (२), (एफ), ६५ (२), ३५१ (३) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ५ (एन), ६, ८, ९ (एन), १० पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच ४२ वर्षांच्या आरोपी चुलत भावाला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. चुलत काकाने त्याच्या दहा वर्षांच्या पुतणीवर लैगिंक अत्याचार केल्याचे वृत्त समजताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.