लिफ्टमध्ये बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग
विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांत सुरक्षारक्षकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जुलै २०२४
मुंबई, – लिफ्टमध्ये एका बारा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. या गुन्ह्यांत आयुब समशुद्दीन शेख या ५५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाला मुलुंड पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
३४ वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या कुटुंबियांसोबत मुलुंड परिसरात राहते. तिला बारा वर्षांची एक मुलगी असून शनिवारी सायंकाळी पाच वाजता ही मुलगी लिफ्टमधून घरी जात होती. यावेळी लिफ्टमध्येच सोसायटीच्या सुरक्षारक्षक आयुबने तिच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केला होता. घरी आल्यानंतर या मुलीने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने मुलुंड पोलिसात सुरक्षारक्षक आयुब याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुदध पोलिसांनी ७४ भारतीय न्याय सहिता सहकलम ८, १२, १८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आयुबला त्याच्या भांडुप येथील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान त्याने या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.