मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 मार्च 2025
मुंबई, – अश्लील मॅसेज पाठवून एका 21 वर्षांची सोशल मिडीयावर बदनामी केल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीस दिड महिन्यानंतर मुलुंड पोलिसांनी अटक केली. मोहम्मद अब्दुल मोहम्मद मोईन ताहीर असे या 32 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा अहिल्यानंतरचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहेत. अटकेनंतर त्याला मुलुंड येथील लोकल कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार तरुणी ही मुलुंड परिसरात राहत असून एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेते. जानेवारी महिन्यांत तिला वेगवेगळ्या इंटाग्राम आयडीवरुन अज्ञात व्यक्तीकडून अश्लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठविले जात होते. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र संबंधित व्यक्तीकडून वेगवेगळ्या आयडीचा वापर करुन सतत मॅसेज आणि व्हिडीओ पाठविणे सुरुच होते. इतकेच नव्हे तर तिचा बदनामीकारक व्हिडीओ तयार करुन तो सोशल मिडीयावर अपलोड करुन बदनामी करण्यात आली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार मुलुंड पोलिसांना सांगून संबंधित दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची विनंती केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या घटनेची अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मोरे यांनी गंभीर दखल घेत मुलुंड पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक शिवाजी चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शिवानंद आपुणे, अमोल बोरसे, पोलीस हवालदार चेतन उरणकर, पोलीस शिपाई संदीप कांगणे, महिला पोलीस शिपाई अत्राम, रुपाली हडावळे यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन ते सर्व मॅसेज आणि व्हिडीओ अहिल्यानगर येथून आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने तिथे जाऊन आरोपीचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना मोहम्मद अब्दुल हा एका मैदानाजवळ आला होता. यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच तक्रारदार महिलेला अश्लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून तिची सोशल मिडीयावर बदनामी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला मुलुंड येथील लोकल कोर्टात हजर केल्यानंतर त्याला कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.