तंदुरीच्या पैशांवरुन ३० वर्षांच्या तरुणाची हत्या

मुलुंड येथील घटना; पाचही मारेकर्‍यांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मार्च २०२४
मुंबई, – तंदुरीचे पैसे देण्यावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून दोन तरुणांवर पाचजणांच्या एका टोळीने चाकूसह रॉडने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अक्षय नार्वेकर या ३० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र आकाश साबळे हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कट रचून हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या पाचही मारेकर्‍यांना मुलुंड पोलिसांनी अटक केली. इम्रान महमूद खान, सलीम महमूद खान, फारुख गफार बागवान, नौशादअली गफार बागवान आणि अब्दुल गफार बागवान यातील इम्रान आणि सलीम तर फारुख नौशादअली आणि अब्दुल सख्खे भाऊ आहेत. खान कुटुंबिय ठाणतील वागळे इस्टेट, किसननगर तर इतर तिघेही मुलुंडचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या पाचही आरोपींना मुलुंड येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

इम्रान खान याचे किसननगर परिसरात स्वतचे चिकन सेंटर आहे. रविवारी रात्री नऊ वाजता चिकन तंदुरीचे दोनशे रुपयांमध्ये त्याचे अक्षय आणि आकाशसोबत वाद झाला होता. याच वादातून त्याचा धडा शिकवण्यासाठी इम्रानने त्याचा भाऊ तसेच बागवान बंधूंशी कट रचून अक्षयला मुलुंडच्या चिकन सेंटर येथे बोलाविले होते. तिथे गेल्यानतर या बागवान बंधूंनी अक्षयसह त्याचा मित्र आकाश साबळे याच्यावर चॉपरसह रॉडने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाले होते. त्यामुळे जखमी अवस्थेत त्यांना तातडीने ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान अक्षयचा मृत्यू झाला तर आकाशवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. ही माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्न आणि कट रचणे आदी भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. तपासात इम्रान आणि सलीम यांनीच आकाश आणि अक्षय या दोघांना मुलुंडच्या चिकन सेंटरजवळ बोलावून तिथे त्यांच्यावर बागवान बंधूंच्या मदतीने प्राणघातक हल्ला केला होता. तपासात ही माहिती उघडकीस येताच पळून गेलेल्या इम्रान खान आणि सलीम या दोघांना पोलिसांनी त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी फारुख, नौशादअली आणि अब्दुल गफार या तिन्ही बंधूंना अटक केली. फारुख आणि नौशादने अक्षयच्या डोक्यात रॉडने जोरात हल्ला केला होता, त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर या सर्वांना सोमवारी दुपारी मुलुंडच्या लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच काही तासांत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र दळवी, मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्य पथकातील पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल करांडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल बोरसे, अक्षय ताटे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी पळून गेलेल्या पाचही आरोपींना अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page