मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ जून २०२४
मुंबई, – गुटखा दिला म्हणून रागाच्या भरात एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची तिघांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मुलुंड परिसरात घडली. या हल्ल्यात मोहम्मद हुसैन ताजमोहम्मद खान या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी जबरी चोरीसह हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या तिन्ही आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता मुलुंड येथील वसंत गार्डनजवळील डोंगराळ जंगल परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. १६ वर्षांचा तक्रारदार मुलगा भांडुपच्या सोनापूर परिसरात राहतो. मोहम्मद हुसैन हा त्याचा मित्र आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता तो त्याचा मित्रांसोबत पायवाटेने वसंत गार्डनजवळील डोंगरातील धबधब्याच्या दिशेने जात होते. यावेळी तिथे तीन तरुण आले आणि त्यांनी त्यांचा रस्ता अडविला. त्यापैकी एकाने तक्रारदार मुलाकडे गुटख्याची मागणी केली. त्याने गुटखा नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावरुन या तिघांनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान एका तरुणाने मोहम्मद हुसैन याच्या खिशातील शंभर रुपयांच्या दोन नोटा जबदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने विरोध केल्यानंतर त्यांनी त्याच्यावर चाकूने वार केले. छातीला आणि मांडीला गंभीर दुखापत झाल्याने मोहम्मद हुसैन हा जागीच कोसळला. त्यानंतर ते दोघेही दोनशे रुपये घेऊन पळून गेले.
जखमी झालेल्या मोहम्मद हुसैनला त्याच्या मित्रांनी तातडीने अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदार मुलाने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुटखा आणि पैसे दिले नाही म्हणून मोहम्मद हुसैनची तिघांनी चाकूने भोसकून हत्या केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.