संसार मोडला म्हणून सासूला पेट्रोल ओतून पेटवून दिले
सासूसह आरोपी जावयाचा गंभीररीत्या भाजल्याने मृत्यू
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2025
मुंबई, – संसार मोडला म्हणून रागाच्या भरात एका व्यक्तीने त्याच्याच 72 वर्षांच्या सासूवर हातोड्याने प्राणघातक हल्ला करुन तिच्या अंगावर ओतून पेटवून दिले. या घटनेत सासूसह आरोपी जावयाचा गंभीररीत्या भाजल्याने मृत्यू झाल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. मृतांमध्ये कृष्णा दादाजी अटनकर (59) आणि बाबी दाजी उसरे (72) यांचा समावेश आहे. याप्रकरणी कृष्णा अटनकर याच्याविरुद्ध नवघर पोलिसांनी हत्येसह आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुलुंडमध्ये घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. संसार मोडण्यास सासू बाबी हीच जबाबदार असल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ही घटना मंगळवारी 4 फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता मुलुंड येथील नाणेपाडा, मिठागर रोड, ओमसाई सहकारी सोसायटीमध्ये घडली. कृष्णा हा मुलुंड येथील मिठागर रोड, बाबू म्हात्रे चाळीत राहतो. बाबी ही त्याची वयोवृद्ध सासू असून तिच्याच मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते. मात्र त्यांच्या कौटुंबिक वाद सुरु होता. या वादातून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत होते. सतत होणार्या भांडणानंतर त्याची पत्नी घरातून निघून माहेरी आली होती. तिला तिच्या आई म्हणजे सासू बाबी हिची फुस होती, तिच्यामुळेच त्यांचा संसार मोडला असे कृष्णाला वाटत होते. त्यामुळे 4 फेब्रुवारी तो त्याच्या सासूच्या मिठागर रोडवरील ओमसाई सोसायटीमध्ये गेला होता. त्याने बाबीला त्याच्या तीन चाकी रिक्षातून बाहेर आणले. रस्त्याच्या बाहेरच पार्क केलेल्या टेम्पोमध्ये कोंडून त्याने तिला हातोड्याने बेदम मारहाण केली. आतून कडी लावून त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. यावेळी त्याने स्वतला पेटवून घेतले होते. त्यामुळे या दोघांनाही टेम्पोबाहेर पडता आले नाही. हा प्रकार स्थानिक रहिवाशांकडून समजताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
आगीत गंभीररीत्या भाजलेल्या कृष्णा आणि बाबी यांना पोलिसांनी तातडीने वीर सावरकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नवघर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता. प्राथमिक तपासात बाबी ही कृष्णाची सासू असल्याचे उघडकीस आले. तिच्यामुळे कृष्णाचा संसार मोडल्याचा त्याला राग होता. त्यातून रागाच्या भरात त्याने वयोवृद्ध सासूला टेम्पोमध्ये आणून तिला मारहाण करुन पेटवून घेतले, त्यानंतर त्याने स्वतलाही पेटवून घेतल्याचे उघडकीस आले होते. या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप बाबूराव पाटील यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कृष्णा अटनकरविरुद्ध हत्येसह आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.