अज्ञात कर्मचार्‍याने चौदा लाखांचे ब्रेसलेट पळविले

मुलुंडच्या ओम ज्वेलर्स शॉपमधील घटनेने खळबळ

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 सप्टेंबर 2025
मुंबई, – अज्ञात कर्मचार्‍याने हातचलाखीने ओम ज्वेलर्स दुकानातील सुमारे चौदा लाखांचे चार सोन्याच्या ब्रेसलेटचा अपहार केल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन मुलुंड पोलिसांनी तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत मुलुंड शाखेतील ओम ज्वेलर्स दुकानातील सर्व कर्मचार्‍यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. ब्रेसलेटच्या अपहाराचा प्रकार उघडकीस येताच कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार सुधीर धीरजलाल मकवाना हे दहिसर येथे राहत असून मुलुंडच्या मेसर्च ओम ज्वेलर्समध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांचे मुख्य कार्यालय बोरिवली येथे असून ओम ज्वेलर्सचे बोरिवली, मुलुंड, घाटकोपर आणि वांद्रे परिसरात चार शाखा आहेत. त्यांचा सोन्यासह हिरेजडीत सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ज्वेलर्स दुकानाचे काम सकाळी साडेअकरा ते रात्री साडेआठपर्यंत चालते आणि गुरुवारी चारही शॉप बंद असतात. तिथे त्यांच्यासह 25 कर्मचारी कामाला असून प्रत्येकाला वेगवेगळे काम सोपविण्यात आले आहे. दिवसभरात सोन्याचे दागिने विक्री झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस व्यवहाराची आणि दागिन्यांची गणना करुन त्याची माहिती मालकांना दिली जाते. तसेच वर्षांतून एक सर्व शाखेचे ऑडिट केले जाते.

30 जून 2025 रोजी ओम ज्वेलर्सच्या चारही शाखांमध्ये ऑडिट करण्यात आले होते. त्यात चौदा लाखांचे चार ब्रेसलेट मिसिंग असल्याचे दिसून आले होते. खर्‍या सोन्याच्या जागी इमिटेशन ज्वेलरी ठेवून त्यात दागिन्यांप्रमाणे टॅग लावण्यात आले होते. ते दागिने मुलुंड येथील शाखेतून गहाळ झाले होते. त्यामुळे मुलुंड शाखेतील सर्व कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आली होती, मात्र या ब्रेसलेटबाबत कोणालाही काहीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. अज्ञात कर्मचार्‍याने चारही ब्रेसलेट चोरी करुन त्याजागी इमिटेशन ज्वेलरी ठेवली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मुलुंड पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात कर्मचार्‍याविरुद्ध चौदा लाखांच्या चार ब्रेसलेटचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असून सर्व कर्मचार्‍यांची पुन्हा पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page