मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – चौदा वर्षांच्या मुलीवर तिच्याच २५ वर्षांच्या चुलत भावाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी भावाला नवघर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात पाचहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
पिडीत मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे पोलिसांनी सांगितले. १४ वर्षांची पिडीत मुलगी ही मुलुंड येथे राहत असून याच परिसरात आरोपी राहतो. तो तिचा चुलत भाऊ आहे. जुलै महिन्यांत त्याने तिला त्याचे प्रेम असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने तिच्यावर जुलै महिन्यांत दोन ते तीन वेळा लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. हा प्रकार नंतर तिच्या पालकांना समजताच त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. सोमवारी घडलेला प्रकार तिने नवघर पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी चुलत भावाविरुद्ध ६४ (२), ६४ (एफ), (२), ६४ (आय), (२), ६४ (एम), (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला मेडीकलसाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आले होते, मेडीकलनंतर ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचा रिपोर्ट डॉक्टरांनी दिल्याचे बोलले जाते.