फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी
३५ हजाराची लाच घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ जुलै २०२४
मुंबई, – फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्यासाठी एक लाखांची लाचेची मागणी करुन लाचेचा ३५ हजाराचा पहिला हप्ता घेताना टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक वामन बागुल यांना सोमवारी त्यांच्याच पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकालाच लाच घेताना अटक केल्याने तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार महिला चेंबूर परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिने तिच्या परिचित एका महिलेच्या क्रेडिट सोसायटीमध्े २७ लाख ५० हजाराची गुंतवणुक केली होती. गुंतवणुक रक्कम दुप्पट करुन देते असे सांगून या महिलेला गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते, मात्र तिने दुप्पट रक्कम करुन दिले नाही. त्यामुळे तिने तिच्या गुंतवणुक केलेल्या रक्कमेची मागणी केली होती. यावेळी तिने तिला दहा लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित साडेसतरा लाख रुपये परत केले नव्हते. त्यामुळे या महिलेने तिच्या परिचित महिलेविरुद्ध टिळकनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तक्रारदार महिलेस चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक बागुल यांच्यासमोर हजर केल्यानंतर त्यांनी या महिलेकडे फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामोबदल्यात त्यांनी तिच्याकडे एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने शुक्रवार ५ जुलैला तिने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या अधिकार्यांकडून त्याची शहानिशा करण्यात आली होती. त्यात दिपक बागुल यांनी एक लाखांची मागणी करुन तडजोडीनंतर ३५ हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे तक्रारदार महिला सोमवारी ३५ हजार रुपये घेऊन दिपक बागुल यांना भेटण्यासाठी गेली होती. यावेळी तिच्याकडून लाचेची रक्कम घेताना दिपक बागुल यांना या अधिकार्यांनी अटक केली. त्यांच्याकडून ही रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. याप्रकरणी दिपक बागुल यांच्याविरुद्ध कलम ७ भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.