पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी लाचेची मागणी करणे महागात पडले
जे. जे मार्ग पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांना लाचप्रकरणी अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
मुंबई, – पत्नी आणि मुलगा आधारकार्डवरील पत्त्यावर राहत नसल्याने ते तिथे राहत असल्याचे दाखवून पडताळणी कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सहा हजार रुपयांची लाचेची मागणी करुन पाच हजार रुपयांची लाच घेताना जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पोलीस शिपाई निलेश गजानन शिंदे आणि पोलीस हवालदार साहेबराव दत्ताराम जाधव अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्या अटकेचे वृत्त समजताच तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी लाचेची मागणी करणे या दोघांना चांगलेच महागात पडले असून त्यांच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत जे. जे मार्ग परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्यासह पत्नी आणि मुलाच्या पासपोर्टसाठी अर्ज केला होता. या अर्जानंतर त्यांची फाईल व्हेरीफिकेशनसाठी जे. जे मार्ग पोलीस ठाण्यात पाठविण्यात आली होती. त्यामुळे त्यांना त्यांच्याकडील सर्व कागदपत्रे घेऊन पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. तक्रारदारांनी त्यांच्या पत्नी आणि मुलाचे आधारकार्ड सादर केले होते, त्यात ते दोघेही तिथे राहत नसल्याचे उघडकीस आले होते. ते राहत नसले तरी ते नमूद पत्त्यावर राहत असल्याचे दाखवून कार्यवाही पूर्ण करण्यासाठी पोलीस शिपाई निलेश शिंदे यांनी त्यांच्याकडे सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम दिल्याशिवाय पासपोर्ट व्हेरीफिकेशन होणार नाही असे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. लाचेची तयारी दर्शविल्यानंतर त्यांनी निलेश शिंदे यांच्याविरुद्ध मंगळवार २६ मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यात आली होती. यावेळी निलेशने पाच हजाराची मागणी करुन पासपोर्ट व्हेरीफिकेशन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर बुघवारी या अधिकार्यांनी जे. जे मार्ग पोलीस ठाण्यात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराने ही रक्कम निलेशच्या ड्राव्हरमध्ये ठेवली होती. ही रक्कम तिथे काम करणार्या पोलीस हवालदार साहेबराव जाधव यांनी काढून एका पिशवीत ठेवली होती. याच दरम्यान लाचेच्या रक्कमेसह दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या दोघांविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.