मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ जानेवारी २०२५
मुंबई, – कमर्शियल गुन्ह्यांत कारवाई न करण्यासाठी तीन लाखांची लाचेची मागणी करुन सत्तर हजार रुपयांची लाच घेण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत ज्ञानेशची लवकरच संबंधित विभागाकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार आहे. लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने डोंगरी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार डोंगरी परिसरात राहत असून त्यांच्या भावाला डोंगरी पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत अटक केली होती. या गुन्ह्यांचा तपास ज्ञानेश येडगे यांच्याकडे होता. याच गुन्ह्यांसंदर्भात तक्रारदार पोलीस ठाण्यात आले होते. त्यांची तपास अधिकारी ज्ञानेश येडगे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांना त्यांच्या भावाला कमर्शियल गुन्ह्यांत कारवाई केल्यास त्याला जामिन होणार नाही. तसेच या गुन्ह्यांत त्याला सात ते आठ वर्षांची शिक्षा होईल अशी भीती दाखविली होती. कमर्शियल गुन्ह्यांत कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे तीन लाखांची मागणी केली होती. मात्र लाचेची ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी २ लाख ७० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने १६ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
याच दिवशी या तक्रारीची संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी ज्ञानेश येडगे यांनी तक्रारदाराकडून लाचेची मागणी करुन सत्तर हजाराचा हप्ता घेण्याची तयारी दर्शविली होती. कमर्शियल गुन्ह्यांत कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे उघडकीस येताच त्यांयाविरुद्ध पोलिसांनी कलम ७ भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून ज्ञानेशची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.