नोंदणी प्रमाणपत्रासाठी ४० हजाराची लाच घेणे महागात पडले

कामा हॉस्पिटलच्या प्रबंधकासह दोन लिपिकाला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जानेवारी २०२५
मुंबई, – महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलची नोंदणीसह प्रमाणपत्रासाठी ४० हजाराची लाचेची मागणी करुन लाचेची घेणे कामा हॉस्पिटलच्या प्रबंधकासह दोन लिपिकाला चांगलेच महागात पडले आहे. लाचेची ही रक्कम घेताना प्रबंधक सुरेश पाटील, लिपीक विशाल चव्हाण आणि अमीत महागंडे अशी या तिघांनाही मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. एकाच वेळेस तीन अधिकार्‍यांना लाचप्रकरणी अटक झाल्याने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार सांगलीचे रहिवाशी असून सांगलीच्या आष्टा, ग्रामीण हॉस्पिटलमध्ये क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी म्हणून कामाला आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलची नोंदणी करणे आणि प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक होते. त्यामुळे त्यांनी कामा हॉस्पिटलच्या महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिल येथे नोंदणीसह प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. १३ जानेवारीला ते स्वत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी संबंधित कार्यालयात गेले होते. यावेळी तेथील प्रबंधक सुरेश पाटील यांनी नोंदणीसह प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांच्याकडे चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्याशिवाय त्यांना प्रमाणपत्र मिळणार नाही असे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध बुधवार १५ जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

या तक्रारीची त्याच दिवशी या अधिकार्‍यांकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी लिपीक विशाल चव्हाण यांनी त्यांच्याकडे प्रमाणपत्र देण्यासाठी चाळीस हजार रुपयांची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या अधिकार्‍यांनी गुरुवारी कामा हॉस्पिटलच्या महाराष्ट्र पॅरामेडकील कौन्सिल कार्यालयात सापळा लावला होता. ठरल्याप्रमाणे तक्रारदार तिथे गेले होते. यावेळी विशाल चव्हाण यांच्या सांगण्यावरुन अमीत महागंडे यांनी तक्रारदाराकडून चाळीस हजार रुपयांची लाच घेतली होती. त्यानंतर त्यांनी सुरेश पाटील आणि विशाल चव्हाण यांना पैसे मिळाल्याचे सांगितले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या अधिकार्‍यांनी प्रबंधक सुरेश पाटील, लिपीक विशाल चव्हाण आणि अमीत महांगडे या तिघांनाही लाचेच्या गुन्ह्यांत अटक केली. या तिघांनाही शुक्रवारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यता येणार आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अप्पर पोलीस उप-आयुक्त अनिल तुकाराम घेरडीकर, राजेंद्र गणपत सांगळे यांच्या मार्गदर्शनाली तपास अधिकारी सुप्रिया गावडे, पर्यवेक्षक अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी सांगितले. एकाच वेळेस तीन अधिकार्‍यांवर लाचप्रकरणी कारवाई होण्याची कामा हॉस्पिटलमधील ही पहिलीच घटना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page