सर्वेक्षणात झोपडीचा समावेश करण्यासाठी लाचेची मागणी
२५ हजाराची लाच घेताना खाजगी कंपनीच्या तिघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – सर्वेक्षणात झोपडीचा समावेश करण्यासाठी एका तरुणाकडे एक लाखांची लाचेची मागणी करुन २५ हजाराची लाचेची रक्कम घेताना एका खाजगी कंपनीच्या तीन कर्मचार्यांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. सर्वेक्षक विशाल रामचंद्र पांडेय, पर्यवेक्षक ऋषिकेश रामदास चव्हाण आणि अभिजीत अशोक नागले अशी या तिघांची नावे आहेत. या गुन्ह्यांत उमेश याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. चारही आरोपी टंडन बर्नन सोल्युशन कंपनीचे कर्मचारी आहेत.
यातील २५ वर्षांचा तक्रारदार तरुण सांताक्रुज येथे त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. त्याच्या आजीचे सांताक्रुज येथील कालिना, कुचीकोरवे नगर परिसरात एक झोपडी आहे. या ठिकाणी एसआरएतर्ंगत पुर्नविकासाचे काम सुरु होणार आहे. त्यासाठी एसआरएने टंडन अर्बन सोल्युशून कंपनीला सर्व्हे करण्याचे काम दिले होते. या सर्वेक्षणात तक्रारदाराच्या आजीच्या झोपडीचा समावेश करण्यासाठी त्याने संबंधित कंपनीच्या कर्मचार्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान विशाल पांडेय, ऋषिकेश चव्हाण, अभिजीत नागले आणि उमेश यांनी त्याच्याकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्यानंतर त्याच्या आजीच्या झोपडीचे सर्वेक्षणात समावेश होतील असे सांगण्यात आले होते.
लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने बुधवारी १२ फेब्रुवारीला संबंधित कर्मचार्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची या अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी त्यांनी त्याच्याकडे २५ हजाराची लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या अधिकार्यांनी तिथे सापळा लावून तक्रारदार तरुणाकडून २५ हजाराची लाचेची विशाल पांडेय, ऋषिकेश चव्हाण आणि अभिजीत नागले या तिघांना रंगेहाथ पकडले. या कारवाईदरम्यान उमेश हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.