मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 फेब्रुवारी 2025
मुंबई, – जन्माच्या प्रमाणपत्रात सुधारणा करण्यासाठी चार हजाराची लाचेची मागणी करुन दोन हजाराची लाचेची रक्कम घेताना भायखळा येथील ई वॉर्डच्या आरोग्य विभागाचा 35 वर्षांचा श्रमिक अर्जुन रामतिर्थ निशाद याला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अर्जुनला त्यांच्याच कार्यालयात लाचेच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आल्याने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. अटकेनंतर त्यांना शुक्रवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
यातील तक्रारदार 53 वर्षांचे असून त्यांना त्यांच्या जन्म प्रमाणपत्राची गरज होती. त्यामुळे त्यांनी ऑगस्ट 2024 रोजी महानगरपालिकेच्या ई वॉर्डमध्ये अर्ज केला होता. या अर्जानंतर त्यांना नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या जन्माच्या प्रमाणपत्राची प्रत देण्यात आली होती. या प्रमाणपत्राची पाहणी केली असता त्यात त्यांच्यासह त्यांच्या आईचे नाव चुकीचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी तिथे उपस्थित कर्मचार्यांना त्यांची चूक दाखवून दिली होती. यावेळी या कर्मचार्यांनी त्यांना पुन्हा अर्ज करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी 9 जानेवारी 2025 रोजी नव्याने अर्ज केला होता. मात्र त्यांच्या अर्जावर काहीच कारवाई झाली नव्हती. संबंधित कार्यालयात सतत जाऊनही त्यांना तेथील कर्मचार्यांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे 20 जानेवारीला त्यांनी आरोग्य विभागात श्रमिक म्हणून काम करणार्या अर्जुन निशाद यांची भेट घेतली होती.
यावेळी त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्यासह त्यांच्या आईच्या नावात सुधारणा करुन नवीन जन्माच्या प्रमाणपत्रासाठी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना साडेतीन हजाराची लाच देण्याची तयारी दर्शवून 24 जानेवारीला त्यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित अधिकार्यांनी त्याची शहानिशा केली होती. यावेळी अर्जुन निशाद यांनी तक्रारदाराकडे साडेतीन हजाराची लाचेची मागणी करुन त्यांना दोन हजार रुपये घेऊन त्यांच्या कार्यालयात बोलाविले होते. त्यानंतर या अधिकार्यांनी तिथे सापळा लावून दोन हजाराची लाचेची रक्कम घेताना अर्जुन निशादला रंगेहाथ पकडले.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना शुक्रवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त व पर्यवेक्षक अधिकारी शुभदा मोरे आणि पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिष झेंडे यांनी सांगितले.