सह दुय्यम निबंधकासह खाजगी व्यक्तीला लाचप्रकरणी अटक
55 हजाराची मागणी करुन 35 हजार घेताना एसीबीची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2025
मुंबई, – फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनचे कागदपत्रे देण्यासाठी 55 हजाराची मागणी करुन 35 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी सह दुय्यम निबंधक कार्यालयातील सह दुय्यम निबंधकासह खाजगी एजंट अशा दोघांना शनिवारी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. गजानन प्रल्हादराव खोत आणि विशाल मारुती येरापाले अशी या तिघांची नावे आहेत. यातील गजानन खोत हे सह दुय्यम निबंधक तर विशाल येरापाले हा खाजगी एजंट असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील 55 वर्षांचे तक्रारदार पश्चिम उपनगरात राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एक फ्लॅट खरेदी केला होता. 18 मार्च 2025 रोजी त्यांनी या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन खार येथील अंधेरी क्रमांक चार, सह दुय्यम निबंधक कार्यालयात केले होते. या रजिस्ट्रेशनचे कागदपत्रे मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान खाजगी एजंट असलेल्या विशालशी ओळख झाली होती. त्याने रजिस्ट्रेशनचे कागदपत्रे मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे 55 हजाराच्या लाचेची मागणी केली होती.
ही लाच दिल्यानंतर काही तासांत त्यांना रजिस्ट्रेशन कागदपत्रे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र लाचेची ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्याला 35 हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. शुक्रवारी 28 मार्चला त्यांनी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात विशाल येरापाले याच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. या घटनेनंतर शनिवारी या अधिकार्यांनी संबंधित कार्यालयाजवळ सापळा लावला होता.
यावेळी विशालने तक्रारदाराकडून 35 हजाराची लाच घेतली होती. ही लाच घेतल्यानंतर त्याने तीन हजार रुपये स्वतकडे ठेवून उर्वरित 32 हजार गजानन खोत यांच्या टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवली होती. विशालने गजाजन खोत यांच्या वतीने लाचेची रक्कम स्विकारल्याचे उघडकीस येताच या दोघांनाही या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी गजानन खोत यांच्या ड्राव्हरसह बॅगेतून 1 लाख 94 हजार 450 रुपयांची अतिरिक्त कॅश जप्त केली होती. या दोघांनाही नंतर पुढील चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नेण्यात आले होते. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद सावंत, पोलीस निरीक्षक निलेश पाटील व अन्य पोलीस पथकाने केली.