जप्त केलेले सामान परत करण्यासाठी लाचेची मागणी

बारा हजाराची लाच घेताना मनपा कर्मचार्‍याला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2025
मुंबई, – महानगरपालिकेने जप्त केलेले सामान परत करण्यासाठी पंधरा हजाराची लाचेची मागणी करुन बारा हजाराची लाच घेताना के/पूर्व विभागाच्या मनपाच्या संदीप शाहूराज जोगदंडकर या श्रमिकाला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. संदीपने तक्रारदाराचे जप्त केलेले सामान विकत घेतले होते, तेच सामान परत करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

यातील तक्रारदार पश्चिम उपनगरात राहत असून त्यांचा हातगाडी विक्रीसह भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. 18 जानेवारी के/पूर्व विभागाच्या अधिकार्‍यांनी कारवाई करुन त्यांचे हातगाडी बनविण्याचे सामान जप्त केले होते. या कारवाईनंतर त्यांनी दुसर्‍या दिवशी संबंधित कार्यालयातील अधिकार्‍यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांची संबंधित अधिकार्‍यांशी भेट झाली नाही. 27 जानेवारीला ते पुन्हा के/पूर्व विभागात गेले होते. यावेळी त्यांची निशान उर्मटकर यांची भेट झाली होती. त्यांनी त्यांच्या सामानाबाबत चर्चा केल्यानंतर निशान उर्मटकर यांनी जप्त केलेले सर्व सामान डम्प केले असून आता काहीही होऊ शकत नाही असे सांगितले.

या भेटीनंतर त्यांना त्यांच्या परिचित लोकांकडून के/पूर्व विभागाचे सहाय्यक संदीप यांनी त्यांचे जप्त केलेले सामान विकत घेतल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी संदीप यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या परिचिताला पाठविले होते. यावेळी संदीपने त्यांना जे. बी नगर मेट्रो स्टेशनजवळ बोलाविले होते. त्यामुळे तक्रारदार संदीपला भेटण्यासाठी तिथे गेले होते. या भेटीत संदीपने त्यांच्या सामानाच्या बदल्यात पंधरा हजाराची मागणी केली होती. यावेळी त्यांनी संदीपकडे विनंती केल्यानंतर त्याने बारा हजार रुपये दिल्यानंतर त्यांचे सामान परत करण्याचे आश्वासन दिले होते. ही रक्कम देण्याची तयारी दर्शवून त्यांनी संदीपविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संदीपने लाचेची रक्कम घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर या अधिकार्‍यांनी तिथे सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून बारा हजाराची लाचेची रक्कम घेताना संदीप जोगदंडकर याला या अधिकार्‍यांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्तया आला आहे. ही कारवाई तपास अधिकारी-सहाय्यक पोलीस आयुक्त अर्चना सुतार आणि पर्यवेक्षक अधिकारी-सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश सोनावणे यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page