नोटीस न पाठविण्यासाठी लाचेची मागणी करणे महागात पडले

दहा हजाराच्या लाचप्रकरणी मनपाच्या मुख्य निरीक्षकासह तिघांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 एप्रिल 2025
मुंबई, – महागरपालिकेच्या मोकळ्या जागेत योगा प्रशिक्षण घेतल्याप्रकरणी तिसरी नोटीस न पाठविण्यासाठी दहा हजाराची लाचेची मागणी करुन लाचेची ही रक्कम स्विकारल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या मुख्य निरीक्षकासह दोन शिपायांना बुधवारी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मुख्य निरीक्षक संजय वसंत घोलप, शिपाई तुळशीदास मधुकर कडू आणि सचिन रामदास कोंडविलकर अशी या तिघांची नावे असून एकाच वेळेस तिन्ही कर्मचार्‍यांच्या अटकेने संबंधित विभागात एकच खळबळ उडाली होती. नोटीस न पाठविण्यासाठी लाचेची मागणी करणे या तिघांना चांगलेच महागात पडले आहे.

तीन वर्षांपूर्वी तक्रारदारांना महानगरपालिकेने रोड कटींगमध्ये 225 चौ. फुटाचा एक गाला दिला होता. या गाळ्यासमोरच एक मोकळी जागा असून गेल्या दोन वर्षांपासून या जागेवर तक्रारदार लहान मुलांना योगा शिकवण्याचे काम करतात. महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेवर तक्रारदार योगा प्रशिक्षण देत असल्याने त्यांना मनपाकडून नोटीस पाठविण्यात आली होती. पहिली नोटीस 1 ऑक्टोंबर 2024 आणि दुसरी नोटीस 19 ऑक्टोेंबर 2024 रोजी पाठविण्यात आली होती. त्यामुळे त्यांना महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक अधिक्षक आणि मुख्य निरीक्षक संजय घोलप यांनी चौकशीसाठी बोलाविले होते. त्यामुळे त्यांनी त्यांची भेट घेतली होती.

या भेटीदरम्यान संजय घोलप यांनी त्यांना तुम्हाला तिसरी नोटीस नको असेल तर त्यांना दरमाह दहा हजार रुपयांची लाच द्यावी लागेल. ही लाच दिली नाहीतर त्यांच्यावर तिसरी नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत दिले होते. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने 21 एप्रिलला त्यांनी संजय घोलप यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याची संबंधित अधिकार्‍यांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात संजय घोलप यांनी तिसरी नोटीस न पाठविण्यासाठी त्यांच्याकडे दहा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर या अधिकार्‍यांनी त्यांच्या कार्यालयाजवळ सापळा लावला होता.

यावेळी संजय घोलप यांनी लाचेची दहा हजाराची रक्कम स्विकारुन ती शिपाई तुळशीराम कडू यांना देऊन ती रक्कम सचिन कोंडविलकर याला देण्यास सांगितले होते. त्यानंतर या अधिकार्‍यांनी संजय घोलपसह मनपाच्या दोन्ही शिपायांना दहा हजाराच्या लाचप्रकरणी अटक केली होती. एकाच वेळेस एका अधिकार्‍यासह दोन शिपायांना लाचेच्या गुन्ह्यांत अटक झाल्याने तिथे उपस्थित मनपा अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक व पर्यवेक्षक अधिकारी शैलजा शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिरीष माणगांवे यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page