शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक
तीन लाखांच्या लाचेची मागणी करुन एक लाखाची लाच घेताना कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 मे 2025
मुंबई, – शाळेचे कुलूप तोडून आत प्रवेश करणार्या विरोधकांवर कारवाईसाठी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मदत करणे तसेच शाळेला पोलीस संरक्षण देण्यासाठी तीन लाखांची लाचेची मागणी करुन लाचेचा एक लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव मधुकर देशमुख (57) यांना मंगळवारी 13 मेला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकालाच लाचप्रकरणी अटक झाल्याच्या वृत्ताने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अटकेनंतर त्यांना बुधवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले आहे.
यातील 41 वर्षांचे तक्रारदार गोवंडीतील शिवाजीनगरचे रहिवाशी आहे. ते एका खाजगी ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून काम करतात. त्यांच्या ट्रस्टच्या मालकीची गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात एक शाळा आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी काही लोकांनी शाळेच्या गेटचे कुलूप तोडून जबदस्तीने आत प्रवेश केलाद होता. हा प्रकार लक्षात येताच शाळेच्या वतीने त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासह वरळीतील धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांकडून योग्य ती दखल घेतली जात होती. त्यामुळे त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव देशमुख यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी त्यांना मदत करण्याची विनंती केली होती.
यावेळी बाबूराव देशमुख यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांना मदत करण्यासाठी, धर्मादाय आयुक्त कार्यालयातून अंतिम आदेश येईपर्यंत या ट्रस्टच्या परिसरात विरोधकांना प्रवेश करु न देण्यासाठी तसेच पोलीस संरक्षण देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्याप्रकरणी पोलिसांकडून मदत मिळणार नाही याची खात्री झाल्याने त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शविली होती. चर्चेअंती त्यांच्यात अडीच लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर त्यांनी बाबूराव देशमुख यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची मंगळवारी 13 मेला शहानिशा करण्यात आली होती.
यावेळी बाबूराव देशमुख यांनी लाचेची मागणी करुन पहिला एक लाखांचा हप्ता घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून एक लाखांची लाचेची रक्कम घेताना बाबूराव देशमुख यांना या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नेण्यात आले होते. बुधवारी दुपारी त्यांना विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकालाच एक लाख रुपयांच्या लाचप्रकरणी अटक झाल्याने तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.